तात्या,
तुम्हाला जावून आता उणीपुरी दोन वर्षे पुर्ण होतील. पण माझ्या आयुष्यातील एकही दिवस असा गेला नाही की मला तुमची आठवण आली नाही. तुमचा फोटो पाहताच डोळे पाण्याने आपोआप भरुन येतात. तुम्ही आपल्या कुटूंबाचे आधारवड होता. तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. आतादेखील हे लिहताना अश्रुनी आपली जागा रिकामी केली आहे. माझी अनेक स्वप्ने होती. त्यातील काही स्वप्ने तुम्ही असताना पुर्ण झालीत याचा आनंद आहे. परंतू एक स्वप्न होतं जे आता पूर्ण होताना तुमची उणीव जाणवतेय. आई, तुम्ही आणि आपले सर्व कुटूंब यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शासनाचा शेतीमित्र पुरस्कार स्वीकारण्याचे स्वप्न होतं. आज पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतू तुम्ही नाहीत याची खंत आहे.
मला रियाज मुल्ला साहेब यांचा पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला आणि त्यांनी मला शासनाच्या जीआरची प्रत पाठवली. त्यावेळी मी अक्षरशः हमसून रडलो. कारण मला पहिल्यांदा तुमची आठवण आली. तुमची बैलं, शेती सर्व काही चटकन डोळयासमोर आले. पुरस्कार मिळाल्याचे आनंदाश्रू होतेच परंतू त्यात तुम्ही नसलेल्या दुःखाचे ही अश्रू होते. सुखाच्या झालरीला दुःखाची किनार असते असे म्हणतात ती यालाच.
तुम चे विचार, संस्कार आणि शिकवण घेवून आज आयुष्याचा मार्ग गवसतोय. अनेकदा दमछाक होतेय, ठेच लागतेय. मन रक्तबंबाळ होतेय. पण त्याचवेळी तुमचा चेहरा समोर येतोय आणि सर्व सोसण्याची ताकद मिळतेय. माझे बालपण, शिक्षण, लग्न, कुटूंबाची जबाबदारी पूर्ण करताना तुमची किती दमणूक झाली असेल याची कल्पनादेखील करवत नाही. तुम्ही कुटूंबासाठी केलेल्या अगणित कष्टाची वेळोवेळी जाणीव होतेय. आणि आपणही ही काहीतरी केले पाहीजे याची उर्मी मनामध्ये निर्माण होतेय.
तुम्ही सदैव माझ्या हृदयात आहात. तुमच्या आठवणी कायम रहाव्यात यासाठी काही उपक्रम राबवले आहेत, राबवतोय. तुम्ही शरिराने आमच्यापासून दूर गेला असाल परंतू विचार, संस्कार माझ्यासोबत आहात याची मला पदोपदी जाणीव आहे.
तुमचा आशीर्वाद नेहमी कुटूंबावर रहावा.
आज व्दितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपणास विनम्र अभिवादन..!

डाॅ.संदीप डाकवे
स्पंदन-सांची परिवार
मो.97640 61644