
सातारा(,अजित जगताप) : सातारा शहर व जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. दस्तुरखुद पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय बैठकीमध्ये श्री गणरायाच्या आगमनापूर्वी सर्व रस्त्यातील खड्डे बुजवण्याची सूचना केली होती. पण, प्रशासन याबाबत अपयशी ठरलेले आहे. श्री गणपती गेले गावाला…. खड्डे थांबले रस्त्यात मुक्कामाला….. अशी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे .
सातारा जिल्ह्यामध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेहमीच त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरेखुर्द या गावात दोन महिन्यातून एकदा तरी शासकीय व खाजगी दौरे असतात. अशा वेळेला अनेक मान्यवर त्यांच्या भेटीला जातात. त्यामध्ये काही प्रसारमाध्यमाचेही प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या शेती व पीक पाण्याची चौकशी करण्यासाठी आवर्जून जातात. अशा वेळेला सातारा जिल्ह्यातील समस्या मांडण्यासाठी काही सामाजिक जाणीव असलेले पत्रकार सुद्धा प्रामाणिकपणाने प्रश्न उपस्थित करतात. त्यावर तोडगा ही निघतो. पण सातारा शहर परिसरातील रस्त्यातील खड्डे व त्याबाबतच्या उपाययोजना अजूनही झालेल्या नाहीत. ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही.
सातारा जिल्ह्यातील कमी जास्त प्रमाणात अशी परिस्थिती असून कराड येथे तर शांतता समितीच्या बैठकीत रस्त्यावर पडलेले खड्डे गणेश विसर्जन मिरवणूक पूर्वी मुजवावेत. या मागणीसाठी मनसेचे कराड तालुका अध्यक्ष दादा शिंगण यांनी आग्रही भूमिका मांडली होती. पण, जिल्हा प्रशासनामधील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सा. जि. प . आणि नगरपालिका बांधकाम विभाग यांना त्याचे काही सोयर सुतक नसल्याने गणेश भक्तांना आता याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हिंदू धर्मियांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या श्री गणेश चतुर्थीच्या वेळी रस्त्याची दुरुस्ती व्हावी. ही माफक अपेक्षा होती. पण, तसे झालेले नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय बैठकीत सक्त सूचना केल्या होत्या. तरीही अनेक ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने पालकमंत्र्यांपेक्षा ठेकेदार व बांधकाम अधिकारी हेच महायुतीचे घटक पक्ष असल्यागत वागत आहेत का? असा आता सवाल महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करू लागलेले आहेत.
या रस्त्यांमुळे अपघात होऊन एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा गंभीर अपघात झाला. लोकप्रतिनिधी त्या मुलाला भेटण्यासाठी गेले. पण, आठवडा झाला तरी अद्याप संबंधित ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. अशा या बिकट परिस्थितीने सातारकर नागरिक आगामी विधानसभा निवडणुकीत हे सर्व सहन करून नक्कीच माहितीच्या घटक पक्षातील उमेदवारांना मतदान करतील. असा विश्वास सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या समर्थकांना वाटत आहे. त्यांच्या या धाडसाची ही काही वाहन चालकांनी कौतुक केले आहे.