सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल असलेल्या शिवशाही बसने आज दुपारी सातारा जिल्हा हद्दीतील वाढे फाटा रस्त्यावर अचानक पेट घेतला. त्यामुळे सांगली आगाराच्या चालकाने प्रसंग ओळखून चालक दादासाहेब कोळेकर यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली. प्रवासी वर्गाला जीव वाचवण्यासाठी शिवशाही सोडून रस्त्यावर उतरावे लागले. स्वारगेट येथून सकाळी एम. एच.११बी डब्लू ३२२२ ही शिवशाही बस सातारा हद्दीत पोहोचल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या वाढे फाटा येथे आली असताना दुपारी दोन वाजता शिवशाही बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतला. वाऱ्याची गती वाढल्यामुळे शिवशाही बस मधील ३० प्रवासी यांनी जीव वाचवण्यासाठी शिवशाही बस सोडण्याचा निर्णय एसटीचे वाहक कबीर शेख व प्रवाशांनी घेतला. त्यानंतर सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले. त्यामध्ये रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी झाली होती . सदर अपघाताची माहिती मिळताच एस.टी. महामंडळाच्या सातारा विभागातील विभाग नियंत्रक रोहन पलंगे, वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे, विकास माने, पोलीस अधिकारी विकास धस तानाजी माने ,उमेश बगाडे, नंदकुमार महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बस मध्ये काही प्रवाशांची मौल्यवान वस्तू तसेच बॅग व साहित्य जळून खाक झाल्यामुळे त्यांना आता चिंता लागलेली आहे. सध्या शिवशाही बसने प्रवास करणे धोक्याचे झाल्याची माहिती काही प्रवाशी देत आहेत. यातील बहुतेक बसेस या खाजगी मालक कंत्राटी चालकाला चालवण्यास देत आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणार का नाही? अशी शंका घेतली जात आहे. सतत अपघात घडणाऱ्या या बसचे नाव शिवशाही ऐवजी महायुतीशाही करावी .अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. गणरायाने मोठे विघ्न दूर केल्यामुळे काही भक्त प्रवाशांनी गणरायाचेही आभार मानले आहेत.
