मुंबई (रमेश औताडे) : संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित ” संविधान जागर यात्रा ” ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली होती. ती संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे संयोजक नितिनभाऊ मोरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, भुसावळ या जिल्ह्यामध्ये प्रवास करत सभा बैठका घेत जळगाव मध्ये दखल झाली. जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी सहा हजार किलोमीटर चा प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे.
संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ जवळ यशस्वी झाली आहे असे मोरे यांनी सांगितले. समारोप साठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.