Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रशिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिशुवनचा 'जाणता राजा' राज्यभरात घेऊन जावा ; ज्येष्ठ...

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिशुवनचा ‘जाणता राजा’ राज्यभरात घेऊन जावा ; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : एका बाजूला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचवेळी माटुंगा येथील श्रद्धानंद मार्गावरील शिशुवन या शाळेतील लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘जाणता राजा’ हे महानाट्य सादर करुन नवा इतिहास घडविला. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिशुवन शाळेला भेट देऊन एकदा छोट्या छोट्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवकालीन इतिहास पहावा इतकेच नव्हे तर तो संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते बांदा असा सर्वत्र पोहोचवावा, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी केले. एका बाजूला मराठी आणि गुजराती या दोन समाजात भांडणे लावण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असतांना प्रिन्सिपॉल प्राची रणदिवे आणि विभागप्रमुख वैशाली संघवी यांनी दिग्दर्शक मंदार गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ गुजराती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ हे महानाट्य एखाद्या प्रेक्षागृहात बसवावे, सादर करुन वाहवा मिळवावी, ही साधी सोपी गोष्ट नाही, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी आवर्जून सांगितले. शिशु्वन या माटुंगा येथील शाळेत अवघ्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुली आणि मुलांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य सादर केले. प्रेक्षागृहात अक्षरशः घोड्यावरुन शिवाजी महाराज यांचे आगमन होणे आणि त्यांचा राजाभिषेक प्रसंग दाखवून एकाचवेळी सुमारे एकशेचाळीस विद्यार्थी शिवकालीन इतिहास जागविण्यासाठी रंगमंचावर येणे ही वैशाली संघवी यांची संकल्पना दिग्दर्शक मंदार गोखले यांनी प्रत्यक्षात उतरविली आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी ‘ अशा बुलंद घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि पाचशे वेळा रायगडावर जाऊन घराघरात, मनामनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खराखुरा इतिहास पोहोचविणारे राजेश शांताराम उर्फ राजू देसाई यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने आपण हे सारे सादरीकरण पाहून नतमस्तक झालो आहोत असे सांगून समस्त विद्यार्थी आणि प्रेक्षकांना जमिनीवर डोके टेकवून प्रणाम केला. काही वेळ ते नि:शब्द होत डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. राजू देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, प्रत्येक राज्याला स्वत:ची अस्मिता आहे, तशीच महाराष्ट्राची पण जाज्वल्य अस्मिता आहे, ती जपणे हे त्या त्या राज्यातील नागरिकांचे परम कर्तव्य आहे. असाच अनुभव आज मुंबईतील माटुंगा येथील शिशुवन या शाळेने दाखवून दिला. शाळेच्या प्राथमिक विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. या कार्यक्रमात सुमारे १४० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र भूषण श्री. बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महान नाट्याचा प्रयोग सादर केला. विशेष म्हणजे शाळेत जवळपास ८० टक्के मुले गुजराती समाजाची आहेत. पण त्यांनी ‘जाणता राजा’चे मराठी तून सादरीकरण केले. कोरोना काळाच्या अगोदर याच शाळेतील इयत्ता ७ वे ९ पर्यंत च्या मुलांची वार्षिक सहल ‘किल्ले रायगड’ला जात होती. या सहलीत आपण स्वतः मुलांना गडदर्शन घडवित होतो. महाराष्ट्राची अस्मिता व स्वराज्याचा इतिहास मुलांना कळावा यासाठी शाळेचे कायम प्रयत्न असतात. महाराष्ट्रातील इतर शाळांनी शिशुवन या शाळेचा आदर्श घ्यावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच्या स्नेहसंमेलनात विश्वस्त श्री. झवेरचंद गाला, प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते श्री. राजू देसाई व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम कदम, सुनील दम्मेवाल हेही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments