सातारा (अजित जगताप ) : लोकशाहीमध्ये काही लाडक्या नेत्यांबद्दल निष्ठा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सातारकर नागरिक लोकप्रतिनिधीच्या प्रेमापोटी अनेक गोष्टी आत्मसात करतात. कधी कधी भाग्यविधाते, जलनायक व युवकांचे आयडॉल अशी उपाधी देतात. अशा नेत्यांच्या कर्तबगारीने सध्या सातारा प्रवेशद्वारा रस्त्यावरच नैसर्गिक जल अभिषेक होत आहे . त्याने वाहन चालकांसोबत सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की, दुष्काळी भागातील लोकांना पाणी दिसत नाही. त्यामुळे त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. पण, सातारा शहरात त्या प्रवेशद्वारा नजीक दुष्काळी भागातील लोक येतात. चक्क रस्त्यावर जलाभिषेक पाहून सातारकर नागरिक खूप नशीबवान आहेत. असा ते दुवा देतात. त्याचे कारण म्हणजे सातारा- कोरेगाव, सातारा- खटाव ,सातारा- माण तालुक्याकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था नेहमीच चर्चेत येते. आता तर चक्क राष्ट्रीय महामार्ग नजीकच जल अभिषेक होत असल्याने अनेक भक्तांना नवल वाटत आहे. राजकीय व्यक्तींनी एखादा अपशब्द वापरला तर त्याचा निषेध करण्यासाठी काही सत्ताधारी मंडळी याच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करतात. पण ,आता त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी लावण्यात आलेली आहे. हे सुद्धा जनता पाहत आहे .
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ,माण, खटाव या दुष्काळी भागात जर असे लोकप्रतिनिधी असतील तर कधीही दुष्काळ पडणार नाही. कारण, नेत्यांचे जल अभिषेकासाठी बारकाईने लक्ष असते. हे साताऱ्यातच दिसून येत आहे. धन्य ते नेते… धन्य ते कार्यकर्ते… व धन्य ती जनता… असे आता सोलापूर जिल्ह्यातील साताऱ्यात येणारे प्रवासी बोलू लागले आहे. असे कर्तव्यदक्ष काम होण्यासाठी चार आमदार व एक खासदार आणि असंख्य भक्त पाठीशी असावे लागतात. एवढेच नव्हे तर याबाबत संबंधित विभागाचे उत्कृष्ट काम करणारे पुरस्कार प्राप्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनाही धन्यवाद दिल्याशिवाय वाहन चालक पुढे जात नाही. मुळातच या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला श्रद्धास्थान श्रीमंत छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे नाव देऊन त्यांच्यासारखे कार्य करता येत नाही. याचीच कबुली या जलाभिषेकामुळे दिली आहे.
हा स्थानिक राज्यकर्त्याच्या मनाचा मोठेपणा आहे.हे सुद्धा अभ्यासू व जाणकार व्यक्तीने लक्षात ठेवावे. बडे बडे शहरो मे छोटे छोटे हादसे होते है/ असाच हादसा मानून गप्प बसावे. अशी विनंती अनेकांनी केलेली आहे
सातारा शहराच्या प्रवेशद्वारा नजीक रस्त्यावर जल अभिषेक
RELATED ARTICLES