ताज्या बातम्या

कलावंत जे पेरतो, तेच उगवते; अहिल्यानगरच्या संगीत नाट्य महोत्सवाने दिली सुरेल प्रचिती!

अहिल्यानगर

: कलावंत जे पेरतो, तेच उगवते, याची प्रचिती अहिल्यानगरच्या संगीत नाट्य महोत्सवात आली. दर्जेदार कलाकृती, प्रभावी सादरीकरण आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद यामुळे तीन दिवसांचा हा महोत्सव केवळ संगीत नाटकांचा सोहळा ठरला नाही, तर लोप पावत चाललेल्या या समृद्ध परंपरेच्या भवितव्याची आश्वासक नांदी ठरला.*

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संगीत नाट्य महोत्सवाचा नजराणा तीन दिवस अहिल्यानगरमधील कलारसिकांना अनुभवायला मिळाला. ‘ऊस डोंगा परी’, ‘संत कान्होपात्रा’ आणि ‘संगीत संशयकल्लोळ’ अशी गाजलेली संगीत नाटके या महोत्सवात सादर करण्यात आली.
या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी श्रुती संगीत निकेतनच्या प्रमुख डॉ. धनश्री खरवंडीकर यांच्याकडे होती. गेल्या बारा वर्षांपासून ही संस्था अहिल्यानगरमध्ये संगीत नाट्य क्षेत्रात कलावंत घडविण्याचे कार्य करीत आहे. पद्मश्री जयमाला शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यांच्या त्या शिष्या आहेत. त्यामुळे संगीत नाट्य परंपरेची जाण, तिच्याविषयीची आस्था आणि नव्या पिढीतील कलावंत घडविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अशा पार्श्वभूमीवर हा महोत्सव त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणे निश्चितच औचित्यपूर्ण म्हणावे लागेल.
महाराष्ट्राला संगीत नाटकांची तब्बल दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई आणि गोवा या भागांत ही परंपरा आजही रडतखडत का होईना, पण सुरू आहे. मात्र, बदलत्या काळात संगीत नाटकांची लोकप्रियता आणि त्यासाठीची रसिकता कमी होत चालल्याचे चित्र दिसत असताना, यंदाचा महोत्सव अहिल्यानगर येथे आयोजित करण्याचा शासनाचा निर्णय सुरुवातीला काहीसा अजब वाटला.

अहिल्यानगर किंवा या जिल्ह्याला संगीत नाटकांची ठोस परंपरा असल्याचे फारसे ऐकिवात नसताना येथे हा महोत्सव आयोजित करण्याचे धाडस सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी का केले असावे, हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात निर्माण झाला.

याच पार्श्वभूमीवर गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांच्या सहकार्याने या महोत्सवाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचा योग आला.
मनात अनेक प्रश्न होते. आजच्या तरुणाईला संगीत नाटक म्हणजे नेमके काय, हे कितपत माहीत असेल? मोबाईलच्या एका क्लिकवर हवे ते मनोरंजन उपलब्ध असताना, संगीत नाटक पाहण्यासाठी कोण येणार? कार्यक्रमाला फार तर संस्थेशी बांधिलकी असलेले कार्यकर्ते आणि आवर्जून निमंत्रित केलेले काही कलारसिक उपस्थित राहतील, अशीच अपेक्षा होती.
मात्र, तीन दिवसांच्या महोत्सवाचा अनुभव घेतल्यानंतर हे सारे अंदाज अक्षरशः फोल ठरले.

आपल्या परंपरेचे विद्रूपीकरण कलावंतांनी केले नाही, तर रसिक आजही पारंपरिक कलाप्रकाराला मनापासून स्वीकारतात आणि भरभरून दाद देतात, हे या महोत्सवाने सिद्ध केले. गरज आहे ती केवळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद कलावंतांच्या सादरीकरणात असण्याची.
समारोपाच्या दिवशी ‘संगीत संशयकल्लोळ’ या गाजलेल्या संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ या नाट्यसंस्थेने अत्यंत शानदार पद्धतीने हे नाटक रंगमंचावर उभे केले. सुरेल नाट्यपदांची ही मैफल अहिल्यानगरमधील संगीत रसिकांना अक्षरशः तृप्त करून गेली.

संगीतबद्ध पदे, कलाकारांचे प्रभावी सादरीकरण, संगीत नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, रंगमंचावरून गायक-नटांचे स्पष्ट उच्चार, आलाप आणि भूमिकेतील भावभावना रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे कसब यामुळे प्रयोग उत्तरोत्तर खुलत गेला.
कानाला गोड वाटणारे संगीत, तबला आणि हार्मोनियमच्या साथीने उमटणारे सुरेल स्वर आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे माऊली सभागृह रसिकांनी अक्षरशः भरून गेले होते. टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दुमदुमून गेले. अनेक नाट्यपदांना रसिकांनी ‘वन्समोअर’ची दाद दिली.

विशेष म्हणजे, कुठेही हुल्लडबाजी नव्हती, शिट्ट्या नव्हत्या, गोंगाट नव्हता. केवळ माना डोलावत आणि टाळ्यांच्या माध्यमातून रसिक प्रत्येक नाट्यपदाला दाद देत होते.

याच क्षणी जाणवले—कलावंत जे पेरतो, तेच उगवते.

सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला हा नाट्यप्रयोग रात्री अकरा वाजता संपला. तब्बल साडेचार तास रंगमंचावर सुरू असलेल्या या संगीत नाटकाला तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रसिक अखेरपर्यंत उपस्थित होते. नाटक संपेपर्यंत रसिकांची उत्सुकता आणि तन्मयता कायम होती. मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन याच क्षणी झाले.

गायक असलेला नट आणि नट असलेला गायक!

संगीत नाटकाची खरी ताकद त्याच्या संवादाइतकीच त्यातील नाट्यपदांमध्ये असते. संवादाच्या प्रवाहात पदे गुंफली जातात आणि नट हाच या सादरीकरणाचा प्रमुख गायक असतो. तो जितका सुरेल गातो, तितका प्रयोग अधिक रंगत जातो.

संगीत नाटकात अभिनय, गायन आणि संवाद यांचा सुरेख मिलाफ साधला जातो. तमाशातील रजवाडी वगाप्रमाणे काही अंशी त्याची रचना वाटत असली, तरी संगीत नाटकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. कथानकाच्या अनुषंगाने संवाद आणि पद म्हणजेच काव्य यांचा सुंदर मिलाफ या कलाप्रकारात पाहायला मिळतो.
मराठी नाट्यसंगीताला दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. नाट्यसंगीत हे गानलुब्ध रसिकांसाठी श्रवणीय मेजवानीच आहे. मात्र, ही मेजवानी रंगमंचावर सादर करणे तितके सोपे नाही.
या कलाप्रकारात गायक हाच नट असतो आणि नट हाच गायक असतो.

त्यासाठी भाषेचे उत्तम ज्ञान, संगीताचा सखोल अभ्यास, शास्त्रीय संगीताची जाण, देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेकीची शैली आणि तत्कालीन व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरून ती भूमिका रंगमंचावर साकारण्याचे कसब आवश्यक असते. गायन आणि अभिनय यांचा असा संगम साधणे ही अत्यंत अवघड आणि जिगरीची गोष्ट आहे.
म्हणूनच संगीत नाटक हा केवळ ऐकण्याचा किंवा पाहण्याचा कलाप्रकार नाही. तो गायन, अभिनय, साहित्य, भाषा आणि संगीत यांचा एकत्रित आविष्कार आहे.

काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली, मोबाईलच्या एका क्लिकवर जग हातात आले; तरीही दर्जेदार सादरीकरण असेल, तर रसिक आजही संगीत नाटकाला मनापासून दाद देतो, हे अहिल्यानगरच्या तीन दिवसांच्या महोत्सवाने ठामपणे दाखवून दिले.
संगीत नाटकाच्या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी अशा महोत्सवांची निश्चितच गरज आहे. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे या परंपरेशी नवी पिढी जोडण्यासाठी दर्जेदार कलावंत घडविणे आणि त्यांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
परंपरा केवळ संग्रहालयात जपून चालत नाही; ती रंगमंचावर जिवंत ठेवावी लागते. पुढच्या पिढीच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण करावे लागते. आणि हे काम केवळ शासनाच्या योजना किंवा महोत्सवांमधून नव्हे, तर कलावंतांच्या सादरीकरणातून घडते.

अहिल्यानगरच्या संगीत नाट्य महोत्सवातील तीन दिवसांची भरगच्च उपस्थिती, रसिकांची तन्मयता आणि प्रत्येक नाट्यपदाला मिळालेली उत्स्फूर्त दाद यामुळे या परंपरेच्या भवितव्याची एक आशावादी, सुरेल नांदी ऐकू आली.

लोप पावत चाललेल्या संगीत नाट्यकलेला सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या महोत्सवाच्या माध्यमातून राजाश्रय दिला, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
कारण शेवटी कला जिवंत राहते ती केवळ रंगमंचावर नाही, तर रसिकांच्या मनात. आणि अहिल्यानगरच्या रसिकांनी या महोत्सवातून हे मन पुन्हा एकदा उघडे ठेवले आहे.

कलावंतांनी सुरांची पेरणी केली आणि रसिकांनी तिची मनापासून उगवण अनुभवली—हीच या संगीत नाट्य महोत्सवाची खरी कमाई!

खंडूराज गायकवाड
(लेखक मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार, लोककलेचे अभ्यासक आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन्मानित आहे.)

Scroll to Top