प्रतिनिधी : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील विविध मंदिरे, सार्वजनिक मंडळे तसेच भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचे आयोजन केले जाते. मात्र, अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता कडक भूमिका घेतली आहे.
भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाप्रसाद व अन्नदानाचे आयोजन करणाऱ्यांसाठी एफडीएचा परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवान्याशिवाय महाप्रसादाचे वाटप केल्यास आयोजकांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे, महाप्रसादासाठी अवघ्या १०० रुपयांत ऑनलाइन परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अन्नसुरक्षेसाठी या चार नियमांचे पालन अनिवार्य
१. स्वच्छ पाण्याचा वापर : स्वयंपाक तसेच पिण्यासाठी केवळ स्वच्छ किंवा आरओ पाण्याचाच वापर करावा.
२. स्वयंसेवकांची स्वच्छता : अन्न तयार करणाऱ्या आणि वाढणाऱ्या स्वयंसेवकांनी मास्क, हँडग्लोव्हज आणि हेड कॅप वापरणे अनिवार्य आहे.
३. अन्न उघड्यावर ठेवू नये : तयार केलेला प्रसाद जास्त वेळ उघड्यावर ठेवू नये. शिळे अथवा खराब झालेले अन्न वाटप केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
४. सुरक्षित भांड्यांचा वापर : अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा इतर सुरक्षित भांड्यांचाच वापर करावा.
महाप्रसादाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने भाविक अन्न ग्रहण करत असल्याने आयोजकांनी अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.




