ताज्या बातम्या
खेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संतापराष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्र प्रदेशाची आढावा व महापरिसंवाद निर्णायक बैठक तसेच पदनियुक्ती प्रदान सोहळा पुण्यात संपन्नपालकमंत्री बदलाबाबत सातारा जिल्ह्यात ना उत्सुकता.. ना पाठिंबा- संदीप पवारराज्य अन्न आयोगाच्या नियुक्त्या नियमावलीनुसारच करा – नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; पत्रकार परिषदेत पारदर्शकतेची मागणी

खेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भर

मुंबई : महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला अधिक सक्षम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या खेलो इंडिया सुधारित योजना (२०२६–३१) अंतर्गत क्रीडा क्षेत्राला मोठी चालना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी तब्बल ३६,४४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पूर्वीच्या तुलनेत ही तरतूद सुमारे आठ पट अधिक आहे. खेळाडूंना मिळणाऱ्या मदतीची संख्या जवळपास दहापट वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) मुंबई प्रादेशिक केंद्रातर्फे मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत खेलो इंडिया सुधारित योजनेची माहिती देण्यात आली. शालेय स्तरापासून क्रीडा प्रतिभेचा शोध घेणे, प्रशिक्षण, स्पर्धांचा अनुभव, उच्चस्तरीय प्रशिक्षण आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना मार्गदर्शन मिळावे, यासाठी एक मजबूत क्रीडा व्यवस्था उभारण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा प्रतिभा आहे. त्यामुळे मुंबईला उच्चस्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र बनवतानाच राज्यातील जिल्ह्यांमध्येही क्रीडा सुविधा, प्रशिक्षक आणि स्पर्धांच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
SAI मुंबई प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (IRS) यांनी सांगितले की, खेलो इंडिया योजनेतून केवळ क्रीडा केंद्रांची संख्या वाढवणे हा उद्देश नसून, शालेय व ग्रामीण स्तरापासून खेळाडूला योग्य प्रशिक्षण, स्पर्धांचा अनुभव आणि उच्चस्तरीय क्रीडा प्रशिक्षणापर्यंत सलग संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.
नऊ प्रमुख घटकांवर भर
सुधारित खेलो इंडिया योजनेत क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धा व लीग, प्रतिभा शोध, खेलो इंडिया प्रशिक्षण सुविधा, प्रशिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा विकास, फिट इंडिया आणि क्रीडा तंत्रज्ञान अशा विविध घटकांचा समावेश आहे. क्रीडा पायाभूत सुविधांसाठी तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
राज्यांमध्ये क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी केंद्र व राज्य यांच्यात ६०:४० खर्चवाटपाचे मॉडेल प्रस्तावित आहे. निधीचा संबंध खेळाडूंची प्रगती, खेळाडू टिकवून ठेवणे, ग्रामीण ते उच्चस्तरीय क्रीडा संक्रमण आणि सुधारणा यांसारख्या परिणामांशी जोडला जाणार आहे.
वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभा शोध
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतीने देशभरातील क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्याची व्यवस्था. खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालये, फीडर स्कूल्स आणि खेलो इंडिया केंद्रे यांचे व्यापक नेटवर्क तयार करून प्रतिभावान खेळाडूंना लहान वयात ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
खेळाडूंना प्रशिक्षणाबरोबरच आहार, निवास, क्रीडा साहित्य, प्रवास, स्पर्धांमध्ये सहभाग, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणासाठीही मदत मिळणार आहे. या प्रक्रियेत क्रीडा विज्ञानातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.
स्पर्धांच्या संधी वाढणार
शाळा, विद्यापीठ, विभागीय, प्रादेशिक आणि विविध क्रीडा लीगच्या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांचा अनुभव देण्यात येणार आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसोबतच पॅरा गेम्स, हिवाळी क्रीडा, बीच गेम्स, आदिवासी क्रीडा, जलक्रीडा आणि अस्मिता महिला लीग यांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
प्रशिक्षक, क्रीडा वैज्ञानिक आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कौशल्य विकास, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण तसेच प्रस्तावित नॅशनल कोच अॅक्रेडिटेशन बोर्ड (NCAB) यावर भर देण्यात आला आहे. डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ आणि बायोमेकॅनिस्ट यांसारख्या तज्ज्ञांचाही खेळाडूंच्या विकासात सहभाग राहणार आहे.
क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर
सुधारित योजनेत क्रीडा तंत्रज्ञानाचा स्वतंत्र घटक समाविष्ट करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिभा शोध, IoT आधारित वेअरेबल उपकरणे, कामगिरीचे विश्लेषण, स्पर्धा व्यवस्थापन आणि क्रीडा शिक्षण यांचा वापर करण्यात येणार आहे.
यावेळी पद्मश्री व मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते आणि पॅरा-बॅडमिंटनमधील पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रमोद भगत, BWF विश्व अजिंक्यपद सुवर्णपदक विजेते सुकांत कदम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिस सुवर्णपदक विजेती ऋतुजा संपतराव भोसले उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शाळा, जिल्हे आणि क्रीडा केंद्रांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत खेळाडूंची वाटचाल अधिक सुलभ करण्यासाठी ही सुधारित योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Scroll to Top