ताज्या बातम्या

शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या गुरुवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : देशातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा प्रणाली लागू करण्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी – मुंबई, महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, पालक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
देशभरातील विविध परीक्षा प्रक्रियांमध्ये कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान केंद्राचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विविध परीक्षा प्रक्रियांतील कथित पेपरफुटी व गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी प्रभावी सुधारणा राबवाव्यात आणि MPSCसह सर्व स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. संबंधित प्रशासनाने संवादातून या प्रश्नावर तोडगा काढावा, असे आवाहनही करण्यात आले.
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून आंदोलकांनी शिस्त आणि संयम राखल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन कोअर कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रणय अहिरे, अमोल आसूळकर, इंद्रजीत मोहिते, अमीर काझी, कुणाल के.ए. यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्था मिळावी यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Scroll to Top