कराड (अमोल पाटील) : राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे सातत्याने केले जातात. मात्र, कराड एसटी आगारातील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची दयनीय अवस्था या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आगारातील वॉटर कूलर परिसरात सर्वत्र प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, साचलेला कचरा, घाण आणि दुर्गंधी यामुळे पिण्याच्या पाण्याची सुविधा अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कराड एसटी आगारातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. प्रवासादरम्यान अनेक जण पिण्याच्या पाण्यासाठी या वॉटर कूलरचा वापर करतात. मात्र, ज्या ठिकाणी स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे, त्याच ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वॉटर कूलरच्या परिसरात साचलेला कचरा, अस्वच्छ वातावरण आणि दुर्गंधी यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत दूषित वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही काही प्रवाशांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, वॉटर कूलरच्या जवळ कचरापेटी उपलब्ध असूनही परिसराची नियमित स्वच्छता होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. कचरापेटी वेळेवर रिकामी न करणे, परिसराची साफसफाई व निर्जंतुकीकरण न होणे आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे आगार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रवाशांच्या मते, पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिक व प्रवाशांनी कराड आगार प्रशासनाकडे तातडीने वॉटर कूलर परिसराची स्वच्छता, नियमित निर्जंतुकीकरण, पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी, कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायमस्वरूपी देखभाल व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच स्वच्छतेसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर नियमित देखरेख ठेवून प्रवाशांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
आता एखादी आरोग्यविषयक गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? की यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करून प्रवाशांच्या आरोग्याचे संरक्षण करणार, असा संतप्त सवाल प्रवासी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




