ताज्या बातम्या

रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांना प्राधान्य; वृक्षसंवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांना अग्रक्रम : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. १० जुलै : राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत असलेल्या देशी प्रजातींच्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले म्हणाले की, हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट आणि जैवविविधतेवरील परिणाम या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक रस्ते प्रकल्पात वृक्षारोपण हा महत्त्वाचा घटक म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.
ते म्हणाले, केवळ झाडे लावणे हा उद्देश नसून त्यांचे संगोपन, संरक्षण आणि नियमित देखभाल यावर शासन विशेष भर देणार आहे. लागवड केलेली झाडे दीर्घकाळ जिवंत राहून वाढावीत, यासाठी प्रभावी देखरेख आणि जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे.
मंत्री भोसले यांनी सांगितले की, देशी वृक्षप्रजातींमुळे जैवविविधतेला चालना मिळते, पक्षी व वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होतो, पाण्याचा वापर कमी होतो आणि वृक्षांचे आयुष्यही अधिक असते. त्यामुळे प्रत्येक परिसराच्या हवामानानुसार योग्य स्थानिक प्रजातींची निवड करून त्या भागातील रोपवाटिकांमधूनच रोपे खरेदी करण्याच्या सूचना विभागाला दिल्या जाणार आहेत.
रस्त्यालगत वृक्षारोपणासोबतच पाणीपुरवठा, संरक्षण, छाटणी, देखभाल आणि संवर्धन यांचा समावेश असलेली व्यापक कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुभवाचा उपयोग करून हा उपक्रम अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येणार असून, प्रत्येक रोपाच्या जतनासाठी नियमित निरीक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. हरित व शाश्वत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री भोसले यांनी केले.
या विषयावरील चर्चेत आमदार सुरेश धस, हेमंत ओगले, हरिश पिंपळे, अजय चौधरी, शेखर निकम आणि भास्कर जाधव यांनी सहभाग घेत रस्त्यालगत हरित पट्टे विकसित करणे, स्थानिक वृक्षप्रजातींना प्राधान्य देणे आणि वृक्षसंवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत विविध सूचना मांडल्या. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

Scroll to Top