तळमावले/वार्ताहर : शब्दांचेचि आमुच्या जीवाचे जीवन, शब्दांचेचि धन वाटू लोका” या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या उक्तीला प्रमाण मानून, संपूर्ण चराचर विठ्ठलमय करणाऱ्या आषाढी वारीच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षरवारकरी संदीप डाकवे अक्षर वारी हा उपक्रम राबवत आहेत.
या उपक्रमाची पूर्वप्रसिद्धी वारीच्या प्रस्थानापूर्वीच भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या दिशेने चालणारी पावले नसून, तो अंतःकरणाचा परमात्म्याकडे होणारा ज्ञान आणि वैराग्याचा प्रवास असतो. वारीच्या या अलौकिक प्रवासात अनेक असे शब्द आहेत, जे वारकऱ्यांच्या जगण्याचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा पाया आहेत. नेमके हेच अध्यात्मिक शब्द निवडून, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानापासून ते थेट आषाढी एकादशीच्या सोहळ्यापर्यंत, संदीप डाकवे दररोज एका विशिष्ट शब्दावर आधारित अभंग आणि त्याची विलोभनीय कॅलिग्राफी साकारून ही ‘अक्षर वारी’ माऊली चरणी अर्पण करणार आहेत.
प्रतिवर्षी पंढरपूर जवळील वाखरी येथील उभ्या रिंगणाचा तो चैतन्यमयी, अमृतमय क्षण डोळ्यांत साठवल्यामुळेच अंतःकरणात ही वारी शब्दांच्या आणि अक्षरांच्या रूपात मांडण्याची प्रेरणा मिळाल्याचे संदीप डाकवे सांगतात.
यंदाच्या या अक्षर वारी उपक्रमात पालखी प्रस्थानापासून ते थेट गोपाळकाल्यापर्यंत, वारीतील प्रत्येक अध्यात्मिक शब्दाची महती कॅलिग्राफीतून उलगडणार असून हा प्रवास विविध भक्तीमय टप्प्यांतून प्रवाहित होणार आहे. यामध्ये प्रस्थान, पालखी, टाळ आणि गगनी झळकणारी भगवी पताका या शब्दांपासून सुरुवात होऊन, माऊलींच्या शिरावरील पवित्र तुळशी वृंदावन, विठ्ठल नामाचे भजन, मृदंग नाद, चैतन्याची पाऊली आणि हरी नामाचा विसावा या शब्दांमधील समर्पणाची भावना रेखाटली जाईल. पुढे कीर्तनाचा गजर, अश्वारूढ देवाचे दर्शन घडवणारे रिंगण, अश्वांची दैवी दौड, पतितपावन चंद्रभागा, तिचे विस्तीर्ण वाळवंट आणि पंढरीत होणारे माऊलींचे आगमन या शब्दांतून ज्ञान आणि वैराग्याचा सोहळा उलगडेल. शेवटी विटेवर समचरण उभा असलेला तो विठ्ठल, त्याची माऊली पाऊले म्हणजेच वीट, डोळ्यांचे पारणे फेडणारे साक्षात दर्शन आणि अद्वैत भावाची अनुभूती देणारा गोपाळकाला अशा वारीच्या एकूण वैभवाचे दर्शन या अक्षर वारीतून घडवले जाईल. तुळशीच्या पानावर विठ्ठल आणि वारकरी संस्कृतीचे हे दर्शन घडवणारी अक्षर वारी केवळ अक्षरांचे कौतुक नसून आत्म्याला विठ्ठल रूपाची अनुभूती देणारा सोहळा ठरेल, अशी भाविकांना खात्री आहे.
या संदीप डाकवे यांना शिवसमर्थ समूहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, त्यांची आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ. रेश्मा डाकवे, चि. स्पंदन आणि कु. सांची यांच्या कौटुंबिक सहकार्यामुळे हा अक्षर भक्तीचा प्रवास अविरत सुरू आहे. वारी सुरू होण्यापूर्वीच या अनोख्या ‘अक्षर वारी’ उपक्रमाचे संपूर्ण वैष्णव संप्रदायातून, वारकऱ्यांकडून भाविकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

व

ारीच्या अनुषंगाने राबवलेले कलात्मक उपक्रम :
अक्षर वारकरी संदीप डाकवे यांनी यापूर्वी मोरपीसावर संत तुकाराम, टी शर्टवर विठूरायाचे चित्र, शब्दातून विठ्ठलाचे चित्र, पोस्टरमधून शुभेच्छा, भिंतीवर वारीचे चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, न अनुभवलेली वारी हस्तलिखित, एका पानावर हरिपाठ, अभंग चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर विठ्ठल, वारकरी पंचावर संत तुकाराम, अक्षर चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर संत तुकाराम, विटेवर विठठ्ल असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.




