मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच झाडाखाली वाहने उभी करणे टाळावे. समुद्रकिनारे, पाणथळ भाग आणि पूरग्रस्त परिसरात जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांवरच विश्वास ठेवावा. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महापालिकेसह विविध शासकीय यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी आणि कर्मचारी शहरभरात अहोरात्र कार्यरत असून, वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजनांचा समन्वय करत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.




