ताज्या बातम्या

कुडाळ प्रा. शाळा परिसरातील काही वृक्ष कोसळण्याच्या प्रतिक्षेत….

कुडाळ(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील मेढानगरी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे बाजारपेठ गाव असलेल्या कुडाळ गावातील सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात काही धोकादायक वृक्ष कोसळण्याच्या प्रतिक्षेत आहे. वनविभागाने तातडीने याबाबत कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कुडाळ नगरीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य वीरेंद्र शिंदे यांनी केली आहे.
जावळी पंचायत समितीचे सभापती श्री. सौरभ शिंदे यांच्याच कुडाळ नगरीतील सातारा जिल्हा परिषदेच्या कुडाळ प्राथमिक शाळेमध्ये चिमुकली मुले इयत्ता पहिली ते चौथी तसेच अंगणवाडी मध्ये जाऊन प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या आवारात भली मोठी वृक्ष व त्यांच्या फांद्या चारी बाजूने पसरले आहेत. काही वृक्षाच्या जमिनीवरील मुळ्या सुद्धा दिसून येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात सुसाट वारा व पाऊस आल्यानंतर काही वृक्षाच्या भल्या मोठ्या फांद्या वाऱ्याने हलतात व त्या आवाजामुळे अंगणवाडी व शाळेत दहशतीचे वातावरण पसरते. चिमुकले घाबरून जातात. वाळलेल्या काही छोट्या-मोठ्या फांद्या अचानक पणाने जमिनीवर कोसळतात. सुदैवाने अद्याप कोणतीही हानी झाली नाही . शाळेच्या आवारामध्ये जेवणाच्या सुट्टीत व इतर कवायतीच्या वेळेला लहान चिमुकले मुक्तपणाने या परिसरात बागडत असतात. मान्सूनच्या विलंबनाने सध्या सर्वत्र दमदार पाऊस सुरू झालेला आहे. अशा वेळेला कुडाळ ग्रामपंचायत व वनविभागाने जबाबदारी तसेच माणुसकी म्हणून या वृक्षाच्या विस्तारलेल्या फांद्या तोडून कर्तव्य दाखवून देणे गरजेचे आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याबाबत विश्लेषण करून पुन्हा झालेल्या नुकसान भरून येत नाही. परंतु, नुकसान होऊच नये. यासाठी प्रयत्न झाले पाहिजे . सध्या या परिसरामध्ये वावरताना पालक, शिक्षक, ग्रामस्थ व शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना काही वृक्षाच्या वाळलेल्या फांद्या कोसळण्याचे भय वाटत आहे. जावळी तालुक्याचे कर्तव्यदक्ष व जबाबदार गटशिक्षणाधिकारी यांच्या बदलीबाबत जावळी पंचायत समिती सभागृहामध्ये विकास कामांपेक्षाही गरमागरम चर्चा होते. पण, कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असो किंवा इतर शाळेच्या आवारातील धोकादायक वृक्षतोडीबाबत शिक्षण प्रेमींना अथवा विकास कामांचे सातत्याने श्रेय घेणारा राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींना जाणीव करून द्यावी लागते. पालक वर्गाने ही आपल्या चिमुकल्यांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत व वन विभाग आणि शिक्षण विभाग यांना लेखी तक्रार करणे आवश्यक आहे. पालकांनी सुद्धा आपल्या चिमुकल्याची काळजी घ्यावी. यासाठी वेळ द्यावा. अशी मागणी होत आहे. लेखी तक्रार करूनही जर जावळी तालुक्यातील शिक्षण व वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर संबंधित कुडाळ नगरीच्या जाणकार पालकांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, जावळीचे सभापती सौरभ शिंदे व जिल्हा परिषद सदस्य सौ. जयश्रीताई सुहास गिरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडावी. शिक्षण व वन विभागाच्या कार्यालयात निवेदन द्यावे. कुडाळ नगरीमध्ये राजकीय पक्षाची जनसंपर्क कार्यालय आहेत. ही कार्यालय फक्त गप्पा मारण्यासाठी नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दाखवून देण्याची ही संधी आहे. त्यामुळे निश्चितच प्रश्न सुटू शकतो. अशीही अपेक्षा व्यक्त आहे. …………………………….. फोटो– सातारा जिल्हा परिषद कुडाळ प्राथमिक शाळेत वृक्षतोड करण्याची गरज (छाया- निनाद जगताप, कुडाळ)

Scroll to Top