
मुंबई : राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय गौरव मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे; तसेच प्रसिद्धीपासून दूर राहून विविध क्षेत्रात दूरगामी समाजहितासाठी सातत्यपूर्ण आणि समर्पित कर्तृत्व बजावणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असतात, अशा असामान्य व्यक्तींची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
पद्म पुरस्कार शिफारस समितीची मंत्रालयात आज मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले; तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना पद्म पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिफारस करताना केवळ प्रसिद्धीपेक्षा समाजासाठी केलेले प्रत्यक्ष योगदान, कार्यातील सातत्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व यांना प्राधान्य देण्यात यावे; तसेच पद्म पुरस्कारांचा दर्जा आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी खऱ्या अर्थाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचीच निवड होणे आवश्यक आहे.
राज्यातील कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, विज्ञान, कृषी, उद्योग, पर्यावरण, लोकसेवा आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा, यासाठी सर्वंकष छाननी करून अंतिम शिफारसी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळावा, या दृष्टीने शिफारसी प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने राबविण्याबाबत समिती सदस्यांनी आपली मते मांडली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठीत करण्यात आलेली ही राज्यस्तरीय समिती विविध प्रस्तावांचा अभ्यास करून अंतिम शिफारसी निश्चित करणार आहे. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक पात्र आणि गुणवंत व्यक्तींना स्थान मिळावे, या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



