कराड : कराड तालुक्यातील मौजे घोगाव येथील श्री बाळसिद्ध मंदिर परिसरातून शेवाळेवाडी (संभाजीनगर) येथे जाणारा साकव पूल सध्या धोकादायक स्थितीत असून, येथे तातडीने संरक्षण भिंत अथवा लोखंडी जाळी बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सदर पुलाच्या कामाच्या वर्क ऑर्डरमध्ये संरक्षण जाळी बसविण्याची स्पष्ट नोंद असतानाही संबंधित ठेकेदाराने अद्याप त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुलाजवळील वळण धोकादायक असून, भरधाव वेगाने येणारी वाहने थेट समोरील खोल खड्ड्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघाताचा धोका अधिक वाढत असून, अनेक वेळा दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन पुलावर मजबूत संरक्षण भिंत किंवा लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




