नवी मुंबई : कोपरखैरणे येथील बोनकोडे नागरी आरोग्य केंद्रात दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एक गरीब महिला आपल्या पाच वर्षीय जखमी मुलाला कडेवर घेऊन धावत धावत उपचारासाठी आली. मुलाच्या जखमेची तीव्रता मोठी असल्याने येथे उपचार शक्य नसल्याचे सांगत तिला एरोली येथे जाण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, गावातील काही युवकांनी ही माहिती समाजसेवक प्रदीप म्हात्रे यांना दिली. त्यांनी तातडीने स्वतःची गाडी घेऊन संबंधित महिला आणि जखमी मुलाला एरोली महानगरपालिका रुग्णालय येथे पोहोचवले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जवळपास एक तास उलटून गेला तरी एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता.
या काळात महिलेची अवस्था अत्यंत दयनीय होती. एका बाजूला जखमी मुलगा उपचारासाठी तडफडत होता, तर दुसऱ्या बाजूला घरी सहा महिन्यांचे बाळ उपाशी असल्याची चिंता तिला सतावत होती. ती वारंवार घरी सोडण्याची विनंती करत होती. रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांना फोन करत होते, मात्र वेळेवर प्रतिसाद मिळत नव्हता.
सुमारे एक तासानंतर डॉक्टर पंडित जाधव रुग्णालयात आले. मात्र, त्यांनीही या रुग्णालयात टाके (स्टीच) करता येणार नसल्याचे सांगत मुलाला छत्रपती शिवाजी रुग्णालय,कळवा येथे नेण्याचा सल्ला दिला. एवढ्या मोठ्या रुग्णालयात साधे टाके मारण्यासाठीही सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या परिस्थितीत श्री. म्हात्रे यांनी त्यांच्या एका डॉक्टर मित्राशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने मदत करत मुलावर उपचार सुरू केले. विशेष म्हणजे, कोणताही शुल्क न घेता त्यांनी उपचार केले आणि आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली. उपचारादरम्यान नर्स किंवा वॉर्डबॉय उपलब्ध नसल्याने स्थानिक युवकांनाच मदतीसाठी पुढे यावे लागले.
या घटनेमुळे नवी मुंबई महानगरपालिका च्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.




