ताज्या बातम्या

घामाचा सन्मान…! सैदापूरच्या त्या ‘स्वच्छता दूता’च्या डोळयांत तरळले आनंदाश्रू

कराड : ज्या हातांतून रोज कचरा उचलला जातो, जे हात समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र राबतात आणि जे चेहरे अनेकदा गर्दीतही अदृश्य राहतात, अशाच एका कष्टकऱ्याचा सन्मान होतो, तेव्हा माणुसकीचे संचित अधिक समृद्ध होते. ज्ञानेश्वर काॅलनी, सैदापूर (ता.कराड) मध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून असाच एक हृदयस्पर्शी छोटेखानी सोहळा पार पडला. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कचरा वाहतूक गाडीचे चालक बाळू हंबीरराव पाटसुपे यांचा गौरव करण्यात आला. हा एका व्यक्तीचा सत्कार नव्हता, तर तो प्रामाणिक कष्टांचा आणि निष्ठेचा सन्मान होता.
1 मे, महाराष्ट्र दिन. सगळीकडे ध्वजारोहण आणि उत्साहाचे वातावरण असताना सैदापूरमध्ये मात्र एक वेगळीच कृतज्ञता जपली जात होती. सैदापूर ग्रामपंचायत अंतर्गत कचरा वाहतूक गाडीवर चालक म्हणून काम करणारे बाळू पाटसुपे हे गेल्या 10 वर्षांपासून नित्यनियमाने आपले कर्तव्य बजावत आहेत.
संदीप डाकवे यांच्या हस्ते बाळू पाटसुपे यांना भारतीय संविधानाची फ्रेम, शाल, श्रीफळ, पुस्तक आणि पेढे देऊन गौरविण्यात आले. अनेकदा सरकारी किंवा सामाजिक कार्यक्रमांत मान्यवरांचाच बोलबाला असतो, मात्र येथे एका कष्टकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून ट्रस्टने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला. यावेळी शिवम असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), श्री सिध्दिविनायक संस्कृती क्रीडा मंडळ विद्यानगर, सैदापूर चे अध्यक्ष राजीव मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.
समाजाची स्वच्छता राखणारे हे हात खऱ्या अर्थाने ‘आरोग्य दूत’ आहेत. पण दुर्दैवाने आपण त्यांना योग्य तो मान देत नाही. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व भिंती ओलांडून ‘माणूस’ म्हणून माणसाचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र दिनी केवळ ऐतिहासिक पराक्रमाचे गोडवे न गाता, वर्तमानात समाजासाठी झटणाऱ्या अशा साध्या पण महत्त्वाच्या माणसांचा सत्कार करणे, हाच खऱ्या अर्थाने राज्याचा गौरव आहे. या संवेदनशील उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत असून स्पंदन ट्रस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

*चौकटीत :*
आम्ही कचरा वेचणारी माणसं, आम्हाला समाजात कोणी जवळ घेत नाही. पण आज स्पंदन ट्रस्टने माझा आपुलकीने सत्कार केला, त्यामुळे माझे आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटते, असे भावूक उद्गार बाळू पाटसुपे यांनी काढले. त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले. आपल्या कामाची समाजात कोणीतरी दखल घेतेय आणि आपल्याला दिला जातोय, ही भावना त्यांना सुखावून गेली.

Scroll to Top