ताज्या बातम्या

NHAI हायवे कामांवर प्रश्नचिन्ह – कराड तालुक्यातील पाचवड फाट्यावर निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार

कराड(प्रताप भणगे) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी रस्ते विकास योजनांअंतर्गत नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांची उभारणी सुरू आहे. मात्र, या कामांच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे सध्या सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. संबंधित ठिकाणी सुमारे 6 इंच जाडीचा आणि जवळपास 2 फूट रुंदीचा पॅच टाकून त्यावर थेट ब्रिक्सचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा पद्धतीने घाईगडबडीत केले जाणारे काम किती टिकाऊ ठरेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
विशेषतः, अशा बांधकामात आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा वापर (क्युरिंग) केला जातो का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता किती दिवस टिकेल, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
स्थानिकांच्या मते, संबंधित विभागाकडून कामांची योग्य तपासणी आणि देखरेख होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
याबाबत संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन कामाची सखोल चौकशी करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Scroll to Top