ताज्या बातम्या

जे.जे. रुग्णालयातील धक्कादायक प्रकार : उपचाराऐवजी पाय कापला, हलगर्जीपणामुळे महिलेची प्रकृती गंभीर

मुंबई : अकोला जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिलेवर सर जे जे हॉस्पिटल येथे झालेल्या कथित हलगर्जी उपचारामुळे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कल्पना बंड (मावशी) या महिलेच्या पायात रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने अकोला येथून मुंबईत उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा संपूर्ण पाय मांडीपर्यंत कापावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरुवातीला “काही चिंता करू नका” असे सांगत औषधोपचार सुरू केले. रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या दिल्यानंतर महिलेचा पाय काळा-निळा पडू लागला. त्यानंतर अचानक इन्फेक्शनचे कारण देत पाय कापण्याचा सल्ला देण्यात आला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र टप्प्याटप्प्याने अखेर संपूर्ण मांडीपर्यंत पाय कापण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
इतक्यावरच हा त्रास थांबला नाही. उपचारादरम्यान कमरेजवळ झालेल्या छोट्याशा फोडीकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने ती जखम वाढत जाऊन मागील भाग गंभीररीत्या सडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आरएमओची भेट घेऊन संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच रुग्णावर योग्य उपचार सुरू करावेत, अशी कडक मागणी करण्यात आली. दोन दिवसांत चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी हर्षाली गायकवाड, संदीप कदम, अमोल शिंदे, अविनाश सकलावे, महेश अडागले, प्रदीप पारधी आदींनी रुग्णाची भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला व “आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत” असा विश्वास दिला.
दरम्यान, या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Scroll to Top