ताज्या बातम्या

व्यसनमुक्त समाजासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई, दि. २६ : व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनासोबत प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या कालावधीतील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे तसेच कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.
यावेळी बोलताना नार्वेकर यांनी व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक व राष्ट्रीय समस्या असल्याचे सांगत, त्याचे दुष्परिणाम आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर गंभीर असल्याचे नमूद केले. युवाशक्तीचे संरक्षण करून देशाला प्रगत दिशेने नेण्यासाठी व्यसनमुक्त समाज घडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. “व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे,” असा संदेश देत त्यांनी नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत, त्यांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. व्यसनामुळे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असल्याने अशा कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा सन्मान करण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारासाठी रु. १५ हजार, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, साडी, खण व श्रीफळ, तर संस्थांसाठी रु. ३० हजार, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्तांमध्ये ८८ पुरुष व १२ महिलांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

Scroll to Top