मुंबई,दि.१६ — चांभार,ढोर, मोची, जयस्वार, रेगर, होलार, जाट, कक्कया अशा विविध जाती, पोटजातीत चर्मकार समाज हा आज विखुरलेला आहे. या समाजाची संघटित शक्ती सरकारला दाखवण्यासाठी आणि चर्मकार समाजाच्या न्याय मागण्यांसाठी बहुभाषिक चर्मकार समाजाची एकजूट घडवून आणण्याचा निर्धार राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी शनिवारी येथे बोलताना केला.
धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो चर्मकार बांधव- भगिनींच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सव सोहळा हजारो चर्मकार बांधव-भगिणींच्या उपस्थित संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना बाबुराव माने यांनी हा निर्धार व्यक्त केला.
उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटकसह सर्व राज्यांमधील चर्मकार समाजातील सर्व जाती- उपजातींना एका छताखाली आणून त्यांची एकजूट व ताकद ही सरकारला दाखवून देणे आणि या संघटित शक्तीच्या जोरावर चर्मकार समाजाच्या शासन दरबारी अनेक वर्ष रखडलेल्या मागण्या मान्य करून घेणे हा राष्ट्रीय चर्मकार संघाचा उद्देश असल्याचे बाबुराव माने यांनी यावेळी सांगितले.
दादासाहेब गायकवाड
सबलीकरण योजनेखाली महाराष्ट्रातील असंख्य भूमिहीन चर्मकारांना राष्ट्रीय चर्मकार संघाने मोफत जमिनी मिळवून दिलेल्या आहेत असा अभिमानाने उल्लेख करून बाबुराव माने पुढे म्हणाले गावा गावातील जात दांडगे, धन दांडग्यांनी अनेक चर्मकारांच्या जमिनी बळकवल्या. परंतु राष्ट्रीय चर्मकार संघाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार-पोलीस व न्यायालयाच्या पातळीवर लढा देऊन या जमिनी आम्ही परत आपल्या बांधवांना मिळून दिलेल्या आहेत. चर्मकार समाजातील असंख्य महिलांवर यापूर्वी अनेक वेळा अत्याचार झालेले आहेत. या प्रकरणातील आरोपी जेलमध्ये जाईपर्यंत आमच्या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लढे दिलेले आहेत. ग्राहकांच्या चपला, बुटांची दुरुस्ती करणाऱ्या चर्मकार कामगाराला फेरीवाला ठरवून त्याला मुंबई,ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होताच आम्ही त्या विरोधात आवाज उठवण्याचे काम आम्ही केलेले आहे.अशी असंख्य सामाजिक कामे राष्ट्रीय चर्मकार संघाने गेल्या पंचवीस वर्षात केलेली आहेत.असे बाबुराव माने यांनी संघटनेने केलेल्या कामगिरीचा आढावा घेताना आवर्जून सांगितले.
*बाबुराव माने यांचे नेतृत्व, चर्मकार समाजाचे भाग्य*—प्रबुद्ध साठे
सामाजिक,राजकीय स्तरावर लढा देता यावा यासाठी चर्मकार बांधवांना तयार करण्याचे, घडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बाबुराव माने हे प्रामाणिकपणे करीत आहेत. समाज शहाणा होऊ नये म्हणून इतर जातीचे नेते घाबरतात. पण समाज शहाणा झाला पाहिजे. माझा चर्मकार बांधव शहाणा झाला पाहिजे म्हणून बाबुराव माने हे विविध कार्यक्रम, आंदोलने, मेळावे घडून आणत आहेत.अशा धाडसी बाबुराव माने यांचे नेतृत्व तुम्हा चर्मकार बांधवांना लाभले हे तुमचे भाग्य आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांच्याविषयी बोलताना प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी यावेळी बोलताना केला.तसेच बौध्द, मातंग,चर्मकार समाजाने एकत्र येऊन त्यांनी आपली ताकद दाखवली पाहिजे असेही प्रबुद्ध साठे म्हणाले.
दलित अत्याचार विरोधी कायदा अर्थात ॲट्रॉसिटी ॲक्टची प्रकरणे महाराष्ट्रात वाढू नये यासाठी पोलिसांनी अतिशय दक्ष राहिले पाहिजे.याबाबतीत कलेक्टर, तहसीलदार यांनीही दक्षता घेतली पाहिजे असे गोर गरिबांचे अॅट्राॅसिटीचे खटले मोफत चालवणारे अॅड. नारायणराव गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
*आंबेडकरांचे पणतू, प्रबुद्ध साठे आदी मान्यवरांची उपस्थिती*
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यास प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे,सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषा विभागाचे प्रमुख प्रा. विजय मोहिते,अॅड सिद्धार्थ हत्तरकर, रिपब्लिकन सेनाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे सासरे पांडुरंग साळवी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय आंबेडकर, कक्कया समाज महासंघाचे निवृत्ती सावळकर,राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते रामभाऊ कदम, परशुराम इंगोले,प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर, माजी अध्यक्ष जगन्नाथ खाडे, जगन्नाथ वाघमारे, महासचिव गणेश खिलारे, मुंबई महिला अध्यक्षा शारदाताई नवले, धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर, कार्याध्यक्ष अशोक देहरे, कक्कया समाज नेते हनुमंत सोनावणे, राम कोकणे, अशोक सूर्यवंशी, शंकर बळी, शंकर खिलारे,जयस्वार समाजाचे अरविंद जयस्वाल, शामलाल जयस्वाल, अशोक आगवणे, अॅड रमेश हंकारे, अशोक हॉलमुखे, नगरसेविका अर्चना शिंदे, पायल खरे,संगीता खराटे,जयश्री सातपुते,अभियंता राजेंद्र बावीसकर,अॅड. प्रल्हाद काळे आदी मान्यवरांसह हजारो समाज बांधव भगिनी या रौप्य महोत्सवी सोहळ्यास उपस्थित होते.
*सात जणांना जीवन गौरव पुरस्कार*
चर्मकार समाजाच्या विकासासाठी भरीव उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संतोष भोईर, श्रीमती कल्पना शिंदे, सत्यवान बेलापूरकर, महादेव कृष्णा शिंदे, उद्योजक आणि चर्मकार समाजाचे आधारस्तंभ सिद्राम मारुती नारायणकर, गोर गरिबांचे ॲट्रॉसिटीचे खटले न्यायालयात मोफत चालवणारे अॅड नारायण गायकवाड, शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कुंडलिक गवळी सर यांचा यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार अध्यक्ष बाबुराव माने यांच्या हस्ते देऊन त्यांचा खास गौरव यावेळी करण्यात आला
*संत रविदास,शिवराय, कक्कया महाराजांची संयुक्त जयंती साजरी*
बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार संघाच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराज,संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,माता सावित्रीबाई फुले,माता रमाई आणि माता फातिमा शेख या संत,राष्ट्र पुरुष, राष्ट्र मातांचा संयुक्त जयंती महोत्सव यावेळी त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करुन चर्मकार बांधव भगिणींनी उभे राहून साजरा केला.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आंबेडकरी विचारांचे अंगार फुलविणारे प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांच्या मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम यावेळेस आयोजित केला होता.
या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन प्रा.माधुरीताई काळभोर,सुरज भोईर यांनी केले.




