ताज्या बातम्या

जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ; जल संदेश पत्रकाचे मुंबईत राहुल नार्वेकरांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : भारतीय जलसंसाधन संस्था, नागपूर केंद्र
आणि लोकवाहिनी समूहातर्फे दरवर्षी १६ ते २२ मार्च या काळात जलजागृती सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने विदर्भातील अनेक शासकीय, निशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये पाणी जपून वापरण्याची, पाण्याची काटकसर करण्याची, पाण्याचा अपव्यय टाळण्याची तसेच पाण्याचा गैरवापर न करण्याची जल प्रतिज्ञा घेतली जाते. दरवर्षी १ ते ३ लाख विद्यार्थी, नागरीक जलप्रतिज्ञा घेतात.
यंदा या उपक्रमात सुमारे ३ लाख नागरिकांसह शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिज्ञा घेणार आहेत. याबाबतच्या जल संदेश पत्रकाचे आज मुंबईत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते विधानभनातील त्यांच्या कक्षात प्रकाशन करण्यात आले आणि जलाजागृती सप्ताहाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन, विशाल परब उपस्थित होते.
भारतीय जलससंसाधन संस्था आणि लोकवाहिनीच्या संयुक्त उपक्रमाचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कौतुक केले. पाण्याच्या दुर्भीक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, आज पाणी वाया जाईल तर तहान उद्या जीव घेईल, तेव्हा सर्वांनी पाणी जपून वापरावे असा संदेशही राहुल नार्वेकर यांनी दिला. जनतेने नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे आणि पाणीपुरवठ्याच्या पायभूत सुविधांचे रक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. जनतेने स्वतःहून जल प्रतिज्ञेच्या उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन जलसंचयाचे महत्त्व पटवून द्यावे आणि नव्या पिढीपुढे आदर्श ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेतर्फे जलजागृती सप्ताहानिमित्त चित्रकला, निबंध स्पर्धां, जलशपथ सेल्फी स्पर्धा सोबत, २० मार्चला नागपुरात वॉटर रनही घेण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. प्रवीण महाजन यांनी सांगितले.

Scroll to Top