कराड(प्रताप भणगे) : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत कराड तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२५ पासून दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळाले नसल्याने घरकुल बांधकामाची कामे रखडली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महत्त्वाची योजना असून ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना घरकुल उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. कराड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सुमारे १९० पेक्षा अधिक गावांतील अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मंजूर झाला आहे. काहींना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले असले तरी दुसऱ्या टप्प्याचा निधी अद्याप न मिळाल्याने बांधकामाची गती मंदावली आहे.
याशिवाय पंचायत समितीत केवळ दोन अभियंते कार्यरत असून प्रत्येक अभियंत्यावर सुमारे १०० गावांची जबाबदारी आहे. गेल्या पाच ते सात महिन्यांपासून घरकुल अभियंत्यांचे मानधनही रखडले असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक घरकुलांची कामे ठप्प अवस्थेत आहेत.
ग्रामीण भागात बांधकामासाठी लागणारा खर्च शहरी भागाच्या तुलनेत अधिक असल्याचेही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम वाढविण्यासह प्रलंबित निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून जोर धरत आहे.




