ताज्या बातम्या

जावळीत रस्त्याच्या निकृष्ट कामाने गाडी पलटी…. ठेकेदार फरार…

मेढा(अजित जगताप)दि: मराठी भाषेमध्ये टांगा पलटी घोडे फरार असे ऐकण्यात आले. परंतु, निकृष्ट दर्जाच्या जावळी तालुक्यातील विकास कामाने रस्त्यावरच गाडी पलटी… ठेकेदार फरार.. अशी गत पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, जोपर्यंत राजाची मर्जी आहे. तोपर्यंत प्रधानाचे कुणीही वाकडे करू शकत नाही. अशी चर्चा मेढा , कुडाळ व आलेवाडी परिसरात रंगू लागलेली आहे.
जावळी तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीमध्ये जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील कुडाळ ,पाचवड, मेढा मार्गे चिपळूण खेड या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे.या कामात नामांकित ठेकेदाराकडून कामाचे गुणवत्ता राखली गेली नाही. त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकत नाही. दहा वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. तरी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाच काळजी घ्यावी लागत आहे. या रस्त्यावर अपघात होत आहेत.
कडक उन्हाळ्याच्या तडाक्यात गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी जावळी तालुक्यात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मेढा नगरीच्या डोंगरावर मानकुमरे पॉईंट जवळ एम एच ११.१४एम व्हि ७३०७ ही गाडी रस्त्यावर खडी मध्ये अडकून आडवी झाली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हा दुसरा अपघात आहे.
जावळी तालुक्यातील गांजे गांवचे पती पत्नी या गाडीतून प्रवास करत होते. त्यांना स्थानिकांच्या मदतीने मेढा पोलीसांनी बाहेर काढले. त्यांना फारशी जखम झाली नसली तरी या अपघाताने एक बाजू समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने पंचनामा केला असला तरी काही गोष्टींचा उल्लेख टाळला आहे असाही पुढे आले आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्याच्या कामासाठी पाणी मारणे गरजेचे आहे. ठेकेदारी घेताना पाणी मारण्याचे ही बिल अदा केले जाते. मग, या ठिकाणी त्याचे काम करताना धूळ उडू नये म्हणून पाणी का मारले नाही.? पाणी नेमके कुठे मुरले? त्याचा आता जाब जनता विचारू लागलेली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी जागोजागी खडीचे ढीग टाकले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट तयार होत आहेत. रस्त्याच्या बाजूला कुठेलेही सुचना फलक नसल्याने वाहन चालकाची मात्र तारांबळ होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी कण्हेर धरणातील पाण्याचा उपसा केला जात आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतीला पाणी मिळत नाही. सदर ठेकेदार हे लोकप्रतिनिधी व मंत्र्यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी असून त्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांचे नातेवाईक महायुतीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. या अपघातामुळे या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे संबंधित ठेकेदारांचे डोळे उघडले जातील की झोपेचे सोंग घेतले जाईल. याची उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असून पुढील दहा वर्ष त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आमच्यावर आहे . या रस्त्याबाबत कोणी काळजी करू नये. असे संबंधितांनी सांगितले आहे.

—————————————————

फोटो– जावळी तालुक्यातील मानकुमरे पॉईंटवर उलटलेली गाडी (छाया– अजित जगताप मेढा)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top