मुंबई : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार यांनी गुरुवारी दिली.
यावेळी समन्वयक रामेश्वर नाईक, अखिल भारतीय धर्म जागरण समिती शरदराव ढोले, जसपाल सिंग सिद्धू, मुखी प्रधान संत दमदमी टकसाल, संत ज्ञानी बाबा हरणाम सिंघ जी महाराज इतर बाबा संत उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या समारंभात देशभरातून संत, समाजनेते आणि लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत.
२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शीख, सिकलगर, बंजारा, लवाणा, मोहीयाल, सिंधी, वाल्मीकी, उदासी आदी समाजातील संत-महंत यांचीही उपस्थिती राहणार आहे.
या समागमाच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य, धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकार रक्षणाच्या संदेशाचा प्रसार करण्याचा उद्देश आहे. सेवा, करुणा आणि त्याग यांसारख्या मूल्यांचा प्रचार-प्रसार विविध उपक्रमांद्वारे केला जाणार आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात लंगर व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुख्य मंडपात हजारो आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष पार्किंग, वैद्यकीय केंद्रे, रुग्णवाहिका आणि स्वयंसेवकांची मोठी फौज तैनात राहणार आहे.
दरम्यान, ‘हिंद दी चादर’ समूहगान कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. राज्यातील हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय एकात्मता, सेवा आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा समागम महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असून देश-विदेशातील भाविकांसाठी तो विशेष आकर्षण ठरणार आहे.




