सातारा(अजित जगताप) : आदरणीय ग्रामीण कविवर्य बहिणाबाई चौधरी यांनी अरे संसार संसार संसार.. जसा तवा चुल्यावर वर ..आधी हाताला चटके ..तेव्हा मिळते भाकर.. अशी कविता करून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. आज हीच भाकर बाजारपेठेमध्ये अनेकांची भूक भागवत आहे.
सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य महोत्सवानिमित्त वर्षभर टिकणाऱ्या ज्वारी, बाजरी भाकरी चक्क कृषी महोत्सवामध्ये विक्री आली होती. अत्यंत पौष्टिक व चवदार भाकरी खऱ्या अर्थाने अनेकांची भूक भागवत आहे. काही वेळेला आपल्या गावातील नातेसंबंध व नातेवाईक यांच्या हातची भाकरी खाण्याचे स्वप्न आता शहरातील लोकांना सुद्धा पाहता येणार आहे. कारण, क्रांतिकारी सातारा जिल्ह्यात बाजारपेठेत आता भाकरी सुद्धा विक्रीस आलेली आहे. कडक पापडा सारख्या भाकरीची चव आता शहरातील लोकांनाही उपलब्ध होणार आहे. धामणेर तालुका कोरेगाव येथील ओम साई महिला गृह उद्योग यांच्या वतीने सौ . सुचिता राहुल कांबळे नावाच्या महिलांनी ही भाकरी तयार केलेली आहे. धामणेर येथील महिला बचत गटाने तसेच इतरांनी ही या भाकरी निर्मितीने खऱ्या अर्थाने क्रांती केलेली आहे. पन्नास रुपयांमध्ये पापडा सारख्या भाकरीने पोटाची भूक भागवली जात आहे. ही भाकरी वर्षभर चांगल्या प्रकारे राहणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी भाकरी सुद्धा खरेदी केलेली आहे. त्यामुळे आता भाकरीची चव न्यारी.. भूक भागवण्यासाठी आता खावी लागणार भाकरी.. असेच नमूद करावे वाटत आहे. आमटी, ताक ,दूध यामध्ये ती चांगल्या पद्धतीने विरघळते. तसेच ती पौष्टिक असल्यामुळे आरोग्यालाही लाभदायक ठरणार आहे. सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे- पवार यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक महिलांनी महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाला धन्यवाद दिले आहेत.
————————-
फोटो साताऱ्यातील कृषी महोत्सवानिमित्त भाकर खरेदी करताना ग्राहक वर्ग (छाया– निनाद जगताप ,सातारा)




