सातारा : शिक्षक ही केवळ नोकरी नसून ती एक आयुष्यभर निभावायची तपश्चर्या असते जिथे स्वतःच्या आयुष्यापेक्षा इतरांचे भविष्य घडवण्याला अधिक महत्त्व असते. अशाच निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने तब्बल एकोणचाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात कार्यरत राहिलेल्या संगीता रामचंद्र सणस या नावामागे केवळ एक शिक्षिका नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारी संवेदनशील मार्गदर्शिका दडलेली आहे. ग्रामीण भागातील साध्या वर्गखोलीपासून ते वरिष्ठ मुख्याध्यापकपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्षातून उमललेल्या कर्तृत्वाचा, शिस्तीतून घडलेल्या नेतृत्वाचा आणि प्रेमातून पेरलेल्या संस्कारांचा प्रेरणादायी इतिहास आहे. आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असताना, त्यांच्या सेवेकडे पाहिले की शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर माणूस घडवण्याची एक पवित्र जबाबदारी आहे, हे ठळकपणे अधोरेखित होते.५ जानेवारी १९६८ रोजी जावली तालुक्यातील सायगाव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. वडील मारुती कदम आणि आई शशिकला कदम हे दोघेही सुशिक्षित असल्याने, घरात शिक्षणाला नेहमीच सर्वोच्च स्थान होते. वडील लष्करी सेवेत असल्यामुळे सात भावंडांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने आईवर होती. कष्ट, शिस्त, संयम आणि मूल्यांची पेरणी याच घरातून संगीताताईंना मिळाली. या संस्कारांनीच त्यांच्या पुढील आयुष्याला दिशा दिली.
गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फलटण येथील महाविद्यालयातून १९८६ साली डी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षक होण्याचा निर्णय हा केवळ रोजगाराचा नव्हता, तर समाजासाठी काहीतरी देण्याचा ध्यास होता. या ध्यासाला साकार रूप देत १९८७ साली सातारा जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीला जि. प. प्राथमिक शाळा, मोरेवाडी येथे काही महिने काम केल्यानंतर महिगाव येथे रुजू झाल्या. खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून जडणघडण याच शाळेत झाली. विद्यार्थ्यांची मानसिकता, ग्रामीण वास्तव, पालकांच्या अपेक्षा आणि शिक्षकाची जबाबदारी या साऱ्यांचे भान येथे अधिक खोलवर रुजले.
त्यानंतर महामुलकरवाडी आणि बेलवडे या जावली तालुक्यातील शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक शाळा, प्रत्येक गाव आणि प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो हे त्यांनी अनुभवातून शिकले. प्रशासकीय नियमानुसार पुढे सातारा तालुक्यातील लिंब येथील क्रमांक एक शाळेत काम केले. गुणवत्तेची शिस्त, शालेय उपक्रमांची अंमलबजावणी आणि पालकांशी समन्वय या बाबतीत येथे त्यांची कसोटी लागली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली.
यानंतर गोगावलेवाडी येथे काही वर्षे सेवा दिल्यानंतर कृष्णानगर शाळेत वरिष्ठ मुख्याध्यापक या पदावर काम करण्याची संधी मिळाली. नेतृत्वाची जबाबदारी, सहकाऱ्यांशी समन्वय, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी आणि प्रशासनाशी संवाद या सगळ्यांचा मेळ साधत त्यांनी शाळेचे कार्य प्रभावीपणे पुढे नेले. ३९ वर्षांच्या सेवाकालात विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच एक बाब केंद्रस्थानी ठेवली ते म्हणजे विद्यार्थ्यांचे हित.
१९८८ साली वाई तालुक्यातील आसरे गावचे रामचंद्र परबती सणस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतींच्या प्रोत्साहनामुळे नोकरीसोबतच संघटनेतील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता आल्या. स्टेजवर उभे राहून आत्मविश्वासाने भाषण करण्याची ताकद, निर्णयक्षमता आणि सार्वजनिक कामातील धैर्य या सगळ्यांना त्यांच्या सहकार्याचीच पाठीशी साथ होती. नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्यांवर संतुलन राखण्याची कला त्यांनी यशस्वीपणे जोपासली.
कुटुंब हे त्यांच्या आयुष्याचे बळ आहे. मुलगा संकेत, सून विभावरी, मुलगी पूजा आणि जावई रामदास, तसेच गोड नातवंडे सान्वी आणि शिवांश या साऱ्यांच्या सहवासात त्यांचे आयुष्य आज समृद्ध आहे. कुटुंबाच्या पाठबळामुळेच त्या आपल्या सेवेत अखंडपणे समर्पित राहू शकल्या.
या प्रदीर्घ प्रवासात त्यांना असंख्य सहकारी, मुख्याध्यापक, अधिकारी आणि मार्गदर्शक लाभले. शिक्षक सहकारी, आजवर लाभलेले मुख्याध्यापक, तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख या सर्वांविषयी त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. “एकटीने कोणीच घडत नाही” या भावनेतूनच त्या सर्वांचे ऋण मान्य करतात.
सेवा पूर्ण करताना त्यांच्या मनात समाधान आहे. आपण शिकवलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडला असेल ही आशा त्यांना आजही उर्जित ठेवते. आणि या प्रवासात कधी अनवधानाने चुका झाल्या असतील, एखादा सहकारी दुखावला गेला असेल, तर त्याबद्दल त्या मनापासून क्षमायाचना करतात हीच त्यांच्या मोठेपणाची खरी ओळख.
आज सेवानिवृत्तीच्या क्षणी संगीता रामचंद्र सणस यांच्या सेवाकालाचा मागोवा घेताना मनात कृतज्ञतेची, समाधानाची आणि अभिमानाची भावना दाटून येते. त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक यशस्वी पाऊल, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्येक सुसंस्कृत वागणूक हेच त्यांच्या तपश्चर्येचे खरे फलित आहे. पद, पुरस्कार किंवा सन्मान यांपलीकडे जाऊन त्यांनी जे अमूल्य दिले, ते म्हणजे मूल्यांची शिदोरी आणि आत्मविश्वासाची शिदोरी. आज जरी त्या औपचारिक सेवेतून निवृत्त होत असल्या, तरी त्यांच्या विचारांची, संस्कारांची आणि प्रेरणेची ज्योत कधीही विझणारी नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या आयुष्याच्या प्रवासातही त्यांचे अनुभव समाजासाठी दीपस्तंभ ठरतील आणि शिक्षकी पेशाच्या गौरवशाली परंपरेत त्यांचे नाव सदैव आदराने स्मरणात राहील.
*हणमंत रसाळ*
*जि.प.शाळा, म्हसवे*
*ता.जि.सातारा*
चौकट
तब्बल ३९ वर्षांच्या सेवेतून संगीता रामचंद्र सणस यांनी शिक्षणाला केवळ नोकरी न मानता संस्कारांची तपश्चर्या म्हणून जपले. ग्रामीण शाळांपासून वरिष्ठ मुख्याध्यापक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास निष्ठा, शिस्त आणि सेवाभावाचा आदर्श ठरतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पेरलेले मूल्यबीज हेच त्यांच्या सेवाकालाचे खरे यश आहे.




