
मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण असून दरवर्षी २६ जानेवारी रोजी तो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून भारत प्रजासत्ताक झाला.
इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संचालक के. रवि (दादा) यांनी यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय परिसरात (रेल्वे फुटपाथ) एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवला. देशभरातून उपचारासाठी आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्ण, इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा कार्यक्रम विशेष ठरला.
या उपक्रमांतर्गत थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट्स, मिठाई, पिण्याच्या पाण्याचे पाउच आणि तिरंगा ध्वज वाटप करून रुग्णांचा सन्मान करण्यात आला. मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार व संगीतकारांनी ध्वजारोहण करत रुग्णांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
या सामाजिक उपक्रमामुळे रुग्णालय परिसरात उत्साह, आशा आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते. माध्यमांशी बोलताना के. रवि (दादा) यांनी सांगितले की, हा उपक्रम गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने सुरू असून यंदाचे १७ वे वर्ष आहे. पीडितांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमास संस्थापक के. रवि (दादा) यांच्यासह देशपातळीवरील समाजसेविका भाग्यश्री वर्तक, सुप्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन, चित्रपट अभिनेते अली खान व त्यांचे सुपुत्र फरहान अली खान, सेवानिवृत्त सहसचिव प्रीतम आठवले, रॉकी फर्नांडिस, डॉ. सौरव सरीन, प्रकाश दुपारगुडे, गणेशराव सूर्यवंशी, विद्यार्थी नेते व मराठी विनोदी अभिनेते नितीन बोधारे, समाजसेविका सीता वेणी, कलियम्मा, वर्ल्ड ग्रुपचे यशकुमार माणक, आलोककुमार कासलीवाल, प्रसिद्ध लेखापाल रवींद्र जैन यांच्यासह रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. के. रविदादा यांनी रुग्णांना मानसिक बळ देत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल रवि, बाला वडियार, कुननु यादव, सुरज मंडल, अजित सिंह, कोविल नाडर, संजय पाटील, नितीन जाधव आणि दिलीप बैरी यांनी विशेष परिश्रम घेतले




