ताज्या बातम्या

“विकासाचे राजकारण करा, स्वार्थाचे नाही” – घनसोली येथे ॲड. उदय दादा पाटील यांचे ठाम प्रतिपादन कराड दक्षिण मधील कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

नवी मुंबई : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी रोजी देशाला संविधान दिले असून लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले अनमोल मत पैशासाठी विकू नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि विकासाच्या विचारावर मतदान करा,” असे ठाम आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा परिषद सदस्य उमेदवार ॲड. उदय दादा पाटील उंडाळकर यांनी घनसोली येथे केले.
मुंबईस्थित कराड दक्षिणमधील कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याचे आयोजन ॲड. उदय दादा पाटील उंडाळकर, सवादे पंचायत समिती उमेदवार नितीन थोरात व येळगाव पंचायत समिती उमेदवार सौ. वृषाली वसंत पाटील यांच्या प्रचारार्थ करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते.
ॲड. उदय दादा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, १९८० नंतर कराड दक्षिणच्या डोंगरी भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला. वाड्या-वस्त्यांना नकाशावर आणण्याचे काम स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांनी केले. वाकुर्डे सिंचन प्रकल्प, वारणेचे पाणी, रस्ते, प्राथमिक शाळा व आरोग्य सुविधा उभारून त्यांनी गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवले. “जे केले नाही त्याचे श्रेय घेऊ नका. जनतेला सत्य माहीत आहे,” असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लगावला.
म्हासोली व येळगाव विभागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून, वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, हाच त्या विकासामागील उद्देश होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही कोणाविरुद्ध बोलत नाही, आमच्या कामावर आणि विकासावर बोलतो. स्वार्थासाठी सत्तेचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करा,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास कराड दक्षिणमधील स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग उपस्थित होता. अनेक मान्यवरांनी काकांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी डोंगर-वाड्या वस्त्यांमध्ये केलेल्या विकासका

र्याचा गौरव केला. “मुंबईत जसा ठाकरे ब्रँड, तसा कराड दक्षिणमध्ये उंडाळकर काकांचा ब्रँड,” असे मनोगतही व्यक्त झाले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका, कोपरखैरणे येथील नवनिर्वाचित नगरसेविका दीक्षा सूर्यकांत कचरे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. विरोधकांकडून कितीही बदनामी वा आमिष दाखवले गेले तरी ॲड. उदय दादा पाटील उंडाळकर, नितीन थोरात व सौ. वृषाली वसंत पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार प्रवीण पाटील यांनी मानले, तर संयोजन अमितराज चव्हाण व विशाल चव्हाण यांनी केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top