महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यातील वाडा–कुंभरोशी गणामध्ये शिवसेना पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार समीर चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना उमेदवाराचा अर्ज वैध असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना उमेदवारांनी सांगितले की, पक्षांतर्गत गटबाजी तसेच विरोधकांनी राजकीय भावनेतून खेळलेली चाल यामुळे हा विरोध करण्यात आला. विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करावे, नको त्या गोष्टी माध्यमांसमोर मांडून तक्रारी करण्याला काहीही अर्थ नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मागील वीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सातत्याने मदत करत आलो आहे. नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. शिवसेना पक्षाने उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला आहे, तो विकासाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा १०० टक्के प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
“२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही सर्व शिंदे साहेब समर्थक एकजूट आहोत. विरोधकांनी शिवसेनेतील नाराज उमेदवारांना पाठीशी न घालता तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




