महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : तळदेव गटातील पक्षांतर्गत नाराजी व गटबाजीच्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम देत एकसंघ ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. नव्या जोमाने, एकाच विचाराने आणि एकीचे बळ दाखवत सत्ताधाऱ्यांविरोधात विजय खेचून आणण्याच्या हेतूने आज (मंगळवार, दि. २० जानेवारी) शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
शिवसेना–युवासेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ संकपाळ, तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर तसेच सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पंचायत समिती तळदेव गणातून अजित संकपाळ, जिल्हा परिषद वाडा–कुंभरोशी गणातून संजय मोरे व संजय शेलार यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
संपूर्ण विभागात गावोगावी बैठका घेऊन जनमत संघटित केले जात असून एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी मायभूमीतील जनता खंबीरपणे एकवटलेली दिसून येत आहे. १०५ गावांची बाजारपेठ असलेल्या तापोळा येथे सरपंच रमेश धनावडे व युवा नेते आनंद धनावडे यांच्या नेतृत्वाखाली तापोळा ग्रामस्थ व व्यापारी मंडळाने शंभर टक्के शिंदे साहेबांसोबत जाण्याचा ठाम निर्णय घेतला. या निर्णयाचे पंचक्रोशीतील इतर गावांकडून विशेष कौतुक होत आहे.
या भूमिकेचे स्वागत शिवसेनेतर्फे तसेच एकनाथजी शिंदे आणि लालबाग–परळचे माजी आमदार दगडू दादा संकपाळ यांनी केले. भागातील इतर गावांनीही याच निर्णयाप्रमाणे शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले.
“आत्ताची निवडणूक ही सत्तेसाठी नसून शिंदे साहेबांच्या विचारांची आहे. तालुक्यांत सुरू असलेल्या विकासकामांना आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेल्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ही लढत आहे,” असे मत लोकनियुक्त सरपंच रमेश धनावडे यांनी व्यक्त केले. तसेच, “साहेबांच्या विचारांना विरोध करणाऱ्यांना येणाऱ्या काळात गय केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जिल्हा परिषद उमेदवार अजित संकपाळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे सर्व समाजबांधवांना आवाहन केले आहे.



