कर्जत : कर्जत तालुक्यात सामाजिक, पर्यावरणीय व शेतकरी प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे, निस्वार्थ जनसेवेचा आदर्श जपणारे सच्चे व प्रामाणिक समाजसेवक केशव बबन तरे यांनी येत्या पंचायत समिती निवडणुकीत दहिवली पंचायत समिती गणातून उमेदवारी स्वीकारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत सचोटीने, एकनिष्ठपणे व प्रामाणिक वृत्तीने सामाजिक कार्य करत तरे यांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर आंदोलने, उपोषणे व लोकशाही मार्गाने संघर्ष उभा केला आहे. भारतीय जनता पक्षच्या विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी या भागातील विकास, पारदर्शक प्रशासन व जनहितासाठी सातत्याने आवाज उठवला. स्वच्छ चारित्र्य, स्पष्ट भूमिका आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची सखोल जाण यामुळे समाजात त्यांची ठळक ओळख निर्माण झाली आहे.
नेरळ–कळंब रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत दर्जेदार काम व्हावे यासाठी रक्षकाची भूमिका बजावली. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रिलायन्स गॅस प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन व उपोषण करून त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. तसेच उल्हासनदीच्या प्रदूषणाविरोधात जनजागृती करत एका खासगी व्यावसायिकाविरोधात ठोस लढा उभारून पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी ‘उल्हासनदी बचाव’ अभियानाच्या माध्यमातून आणि समाजमाध्यमांद्वारे त्यांनी सातत्याने जनमत जागृत केले. यासोबतच स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे आयोजित करून आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या निष्कलंक कार्यशैलीमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे आज सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक व महिलावर्गामधून “केशव बबन तरे यांनीच दहिवली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी” अशी एकमुखी मागणी पुढे येत आहे. प्रामाणिक नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन लाभावा, या अपेक्षेने नागरिकांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र सध्या कर्जत गणात स्पष्टपणे दिसून येत आहे.




