ताज्या बातम्या

महाबळेश्वर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीचा तिढा कायम पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; चौरंगी लढतीचे संकेत

महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होऊन दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मात्र १७ जानेवारी अखेर तब्बल ३५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन गेले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांकडून तळदेव गणातून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने सर्वच पक्षांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल सातारा येथे नामदार मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. दिनांक १७ जानेवारी रोजी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल संकपाळ, उपजिल्हाप्रमुख संजय शेलार आणि तालुका प्रमुख गणेश उत्तेकर यांच्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. रविवारी सकाळी उमेदवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा असतानाही अद्याप नावांची यादी प्रसिद्ध झालेली नाही.
या विलंबामुळे दोन्ही पक्षांमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत असून त्याचा परिणाम निवडणूक वातावरणावर होत आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य मतदारांमध्ये मात्र “उमेदवार विकास करणारा असावा, जिरवाजिरवी करणारा नसावा,” अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
महाबळेश्वर तालुका हा नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मायभूमी असल्याने, शिंदे समर्थकांची भूमिका काय राहणार आणि विरोधकांना कसा सामना करावा लागणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपकडून राष्ट्रवादी व शिवसेनेतील नाराज इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू असल्याची चर्चा असून, येणारी लढत राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित आणि भाजप अशी चौरंगी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top