मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ने मुंबईतील काँग्रेस नेते व विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची सार्वजनिक मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. AICC चे सचिव यू. बी. वेंकटेश यांनी 17 जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये, माध्यमांमध्ये करण्यात आलेली वक्तव्ये ही पक्षशिस्तीचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले आहे.
नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, पक्षातील संघटनात्मक बाबी, नेतृत्व तसेच अंतर्गत मतभेद हे सार्वजनिक मंचावर मांडणे अयोग्य असून ते अंतर्गत व्यासपीठावरच मांडणे अपेक्षित असते. अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते, गोंधळ निर्माण होतो आणि संघटनात्मक एकतेला धक्का बसतो, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता भाई जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून, या नोटीसीला ते काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




