ताज्या बातम्या

वसंतरावांनी दिलेली ‘आहुति’ चक्क साठ वर्षांची झाली ! -योगेश वसंत त्रिवेदी

९ सप्टेंबर १९४२ रोजी शिरीषकुमार पुष्पेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबारच्या स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या १५ व्या वर्षी भाग घेतल्यानंतर ब्रिटीशांशी दोन हात करणाऱ्या वसंतराव मधुसूदन त्रिवेदी यांनी उर्वरित आयुष्य हे आपले नाही, हा माझ्या जीवनाचा बोनस आहे असे समजून ‘समाजाय इदम् न मम !’ हे ब्रीदवाक्य मनाशी कोरुन ठेवले आणि आपल्या उर्वरित आयुष्याची वाटचाल सुरु केली. वडिल मधुसूदन माणेकलाल त्रिवेदी कर्मकांडी ब्राह्मण. समाजातले पहिले बीएएलएलबी वकील. पण वसंतरावांचा चळवळीचा पिंड. त्यांना स्वस्थ बसू देईना. धुळ्याच्या आप्पासाहेब उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र हरिजन सेवक संघात कामाला सुरुवात केली. शंकर गोरख पाटलांच्या ‘पडसाद’ साप्ताहिकाचे काम पाहता पाहता वसंतरावांची १९५४ साली आप्पासाहेबांनी अंबरनाथचे प्रचारक म्हणून नियुक्ती केली. आणि खऱ्या अर्थाने वसंतरावांची कारकीर्द अंबरनाथला सुरु झाली. मधल्या काळात नंदुरबारच्याच दादा गणपती समोर वास्तव्यास असलेल्या चंदुलाल शंकरलाल त्रिवेदी यांची सुविद्य कन्या चि. सौ. कां. मनोरमा यांच्यासमवेत वसंतरावांचा विवाह संपन्न झाला. परंतु माहेरच्या समृद्ध संपन्न पार्श्वभूमि असलेल्या मनोरमाबेनने सुखीजीवनावर तुळशीपत्र ठेवून वसंतरावांच्या काटेरी आयुष्याला साथ देणे पसंत केले. वसंतराव धुळे-नंदुरबार-दोंडाईचा येथून तत्पूर्वी मुंबईचा नवशक्ति, नाशिकचा गांवकरी येथे बातम्या पाठवीत असत तसेच अंबरनाथला आल्यावरही पत्रकारिता सुरुच ठेवली. पत्रकारिता आणि समाजकार्य हातात हात घालून आणि खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करीत होती. वसंतरावांची लिखाणाची तळमळ आणि समजाचे प्रश्न मांडून ते सोडविण्याची कळकळ पाहून त्यांचे सहकारी बाळकृष्ण भट्ट, जगदीश दामले, कल्याणचे प्र. ना. उर्फ बाबा बेटावदकर, शांताराम नाईक आदींनी वसंतरावांना स्वतःचे वृत्तपत्र काढण्याचा सल्ला देऊन घोड्यावर बसविले. वसंतरावांच्या मनात वृत्तपत्राची कल्पना घर करुन बसली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. वृत्तपत्र निबंधकांकडे ‘कर्तव्य’, ‘समिधा’ आणि ‘आहुति’ ही तीन नांवे दिली. त्यातले ‘आहुति’ हे नांव मंजूर झाले. महाराष्ट्र माऊली परमपूज्य पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींच्या पुण्यतिथीदिनी ११ जून १९६६ रोजी ‘आहुति’ पाक्षिक सुरु केले. सहाच महिन्यात आहुति साप्ताहिक म्हणून पुढे झेपावले. भाऊसाहेब परांजपे यांनी १९४८ साली ‘सुर्योदय’ सुरु केले होते तर यशवंतराव चव्हाणांनी ‘अंबरनाथ पाक्षिक पत्रिका’ काढली. भाऊसाहेबांचे पुत्र श्रीहरी परांजपेंनीही काही वर्ष वृत्तपत्र काढून पाहण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. चिंतामण म्हात्रे यांनीही ‘त्रिशुल’ आणि ‘कुष्ठमित्र’ सुरु केले. वृत्तपत्र काढणे आणि ते सातत्याने चालविणे हे एक असिधारा व्रत वसंतरावांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन अखंडपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. वसंतरावांनी ‘आहुति’च्या कल्याण, डोंबिवली, वसई, पालघर, डहाणू, अशा विविध आवृत्त्याही काढल्या. श्याम जोशींनी आहुतिचा मनमाड येथे तर राजन भोसले यांनी आहुतिचा मीरा भाईंदर येथे विस्तार केला. सुरुवातीच्या काळात तर ‘आहुति’ मधल्या विशेष बातम्या मुंबईतली वृत्तपत्रे अग्रक्रमाने प्रसिद्ध करीत असत. पूर्वी आजच्यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित नव्हते. जुळणी, छपाई सारी कामे वसंतराव आणि परिवार करीत असे. १९७५ ते १९७७ च्या आणिबाणी काळात वसंतराव एका बाजूला भूमिगत चळवळ राबवीत असतांना आहुतिने वेगळी भूमिका पार पाडली. वसंतरावांची राजकीय भूमिका आहुतिच्या निःपक्षपातीपणाच्या आड आली नाही. सर्व संकटांचा सामना करता करता १४ जून १९९२ ला ‘आहुति’ ने दिमाखदार रौप्यमहोत्सवी सोहळा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा केला. मधुकरराव चौधरी, डॉ. मनोहर गजानन जोशी, साबिरभाई शेख, राम कापसे, नकुल पाटील आणि प्रकाश देशमुखांनी यावेळी अंबरनाथवासियांना बौद्धिक मेजवानीच दिली. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथचे स्वतंत्र अस्तित्व, तालुका आदि प्रश्न आहुतिने हिरिरीने मांडले. . संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले अग्रणी श्रीधर महादेव तथा एस्. एम्. जोशी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भाऊसाहेब रानडे, प्रा. मधू दंडवते, डॉ. बापू काळदाते, रामभाऊ म्हाळगी, भाई वैद्य, आनंद दिघे आदींचे मार्गदर्शन आहुतिला लाभले आहे. पालघर चे गोविंद चिंतामण उर्फ मामा मराठे, जव्हार चे उद्धवराव कुलकर्णी, सफाळ्याचे ह. म. दीक्षित, ठाण्याचे गो. ना. सोहोनी, काका पाटणकर, भाऊसाहेब वर्तक, शांतारामभाऊ घोलप, नकुल पाटील, दादासाहेब नलावडे, सुधीरभाऊ जोशी, रामदासभाई कदम, सलीम झकेरिया, गणेश नाईक, प्रकाश परांजपे, प्रकाश देशमुख, देवदास मटाले, नारायणराव हरळीकर, रवींद्र वैद्य, विजय वैद्य, अजय वैद्य, अनिल जोशी आदींनी तर आपलेपणाने आहुतिच्या पर्णकुटीला भेट दिलीय. कृष्णाजी विश्वनाथ उर्फ भाऊसाहेब केतकर, सुजाता जोग, सुनील नाईक, आप्पा जोशी आणि त्यांचे कुटुंबीय, पुरुषोत्तम सखाराम उर्फ तात्यासाहेब कानेटकर आणि त्यांचे कुटुंबीय, दादासाहेब रेगे आणि त्यांचे कुटुंबीय, अर्जून भालेराव, हा प्रसाद महाराजांचा कुटुंब कबिला आहुतिच्या परिवारात सहजपणे मिसळून गेला. बाळकृष्ण भट्ट, विजय वैद्य, विनायक बेटावदकर, दामुभाई ठक्कर, प्रकाश आणि माई देशमुख, राजन चव्हाण, कुमार कदम, देवदास मटाले, सुनील नाईक, शशीकला रेवणकर, अनुराधा आणि श्याम जुवेकर, जयंत आणि शुभांगी लेले, मोतीलाल तांबोळी यांच्या संपूर्ण परिवाराचा आहुतिच्या परिवारात अविभाज्य घटक म्हणून समावेश आहे. हळूहळू आहुतिच्या परिवारात किसन कथोरे, सुभाष पिसाळ, गुलाबराव करंजुले, ए. के. शेख, ख्वाजाभाई चौधरी, वसंतराव देशमुख, जयंत करंजवकर, वीणा गावडे, किरण नाईक, संजय डहाळे, सूर्यकांत लाडे, राजेंद्र कांबळे, प्रभाकर राणे, विजय शिंदे, प्रदीप वेर्णेकर, शुभेच्छा वेर्णेकर, सॅम्युएल कुबेर, हरीभाऊ मोझर, सुभाषचंद्र (भाई) मयेकर, कृष्णाभाऊ शेवडीकर, विलास मराठे, यदुनाथ जोशी, किशोर पाटील, युवराज ठाकूर, पद्माकर विसपुते, जे.आर.पाटील, मोहिनी अणावकर, रेखा बोऱ्हाडे, प्रा. नयना रेगे, डॉ. विलास कुमठेकर, खंडुराज गायकवाड, शिवभक्त श्री राजू देसाई आदी दिग्गज मंडळी सुद्धा जोडली गेली. १९९६ च्या १० एप्रिलला वसंतरावानी इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर ‘आहुति’ ची धुरा गिरीश त्रिवेदी यांनी समर्थपणे सांभाळली. वसंतरावांच्या पश्चात गिरीश त्रिवेदींनी विविध उपक्रम, विशेषांक प्रसिद्ध करुन आहुतिचा नावलौकिक वाढविला. देदिप्यमान सुवर्ण महोत्सवी वर्ष ‘आहुति’ ने पूर्ण केले असून आता चक्क साठाव्या वर्षात पदर्पण केले आहे. या वर्षभरासाठी नवनवीन संकल्प गिरीश त्रिवेदी यांनी हाती घेतले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी त्यांना अक्षयपात्र लाभो तसेच शतक महोत्सव साजरा करण्याचे भाग्य ‘आहुति’ला लाभो, या मनःपूर्वक शुभेच्छा !
वसंतराव त्रिवेदींनी आपल्या आयुष्याची समिधा अर्पण करुन आहुति चा यज्ञकुंड धगधगत ठेवला. चोवीस वर्षापूर्वी वसंतरावांनी इहलोकाहून स्वर्गलोकी प्रस्थान ठेवले आणि आहुतिच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच मातोश्री मनोरमाबेन त्रिवेदी यांनी पौष शुद्ध एकादशी, शके १९३७, बुधवार, २० जानेवारी २०१६ रोजी रात्री ९.४० च्या सुमारास या विश्वाचा निरोप घेतला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीदेवींनी जगाचा निरोप घेतल्यानंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडांप्रमाणे योगेश, गिरीश(मुकेश), जयेश आणि तृप्ती ही भावंडे मातृ-पितृछत्र हरपल्याने पोरकी झाली. समाजाय इदम् न मम म्हणणाऱ्या वसंतराव आणि मनोरमाबेनच्या या चार अपत्यांकडे आणि आहुति कडे समाजानेच सहानुभूतीने लक्ष देऊन आहुतिची हीरक महोत्सव ते शतक ही झळाळती वाटचाल पूर्ण करावी ही श्री गजाननाचरणी विनम्र प्रार्थना ! || हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे; सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ||

. बाळ देशपांडे, मधू उपासनी यांची हमखास मदत ! वसंतराव त्रिवेदी आणि ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब देशपांडे यांचे नाते सख्ख्या भावाप्रमाणे. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती, समाजवादी चळवळ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्याशी निगडीत असलेले वसंतराव आणि बाळासाहेब हे सर्वत्र एकत्र. आहुति च्या दीपावली विशेषांकासाठी बाळासाहेब हे दरवर्षी पाचशे रुपयांची जाहिरात आवर्जून देत असत. आज पाचशे रुपये सहजगत्या खर्च होतात परंतु त्यावेळी पाचशे रुपयांची किंमत खूप असे. असेच जीवाभावाचे सहकारी मधुकर उपासनी. दरवर्षी ते न चुकता एक हजार रुपये वर्गणी म्हणून देत असत. अशी असंख्य जीवाभावाची माणसे वसंतरावांनी जोडली होती, अगदी नंदुरबारच्या डॉ. पीतांबर सरोदे, ओंकार मिसर आदी सहकाऱ्यांपासून तर मुंबईतील अनेक सहकार्यांपर्यंत. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त या सर्वांना मानाचा मुजरा.

—–योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२८३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top