
प्रतिनिधी : अंधेरी येथील निवडणूक कार्यालयात आज वॉर्ड क्रमांक ६० (महिला राखीव) साठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी असलेल्या श्रीमती दिव्या ढोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांचा कोणताही पूर्वनियोजित विचार नव्हता. मात्र कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक रहिवाशांनी सातत्याने आग्रह धरत “ही लढत आमच्यासाठी आहे, तुमचा निर्णय आमचे प्रतिनिधित्व करेल” अशी भूमिका मांडल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती दिव्या ढोले यांनी स्पष्ट केले की हा निर्णय पक्षाविरोधातील बंडखोरी नसून, तो केवळ पक्षांतर्गत निर्माण झालेल्या नाराजीचा आणि असंतोषाचा व्यक्त झालेला आवाज आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करूनही त्या कामाची दखल घेतली जात नाही, कामगिरीचे श्रेय दुर्लक्षित राहते आणि निर्णयामागील कारणे स्पष्ट केली जात नाहीत, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे.
भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असली तरी अनेक वेळा पक्षासाठी ठोस योगदान न दिलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जाते, असा आरोप त्यांनी केला. स्वतःच्या घरची पदरमोड करून, नोकरीतील पैसा पक्षवाढीसाठी खर्च करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“समान निकषांवर कामगिरीचे मूल्यमापन झाले तर ते समजू शकते; मात्र केवळ दुर्लक्ष आणि मौन हे उत्तर ठरू शकत नाही,” असे सांगत स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला साथ देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले काम प्रामाणिक असल्याने जनता जनार्दनच योग्य निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




