मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी

आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनामध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी पार पडला.
या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी स्नेहल व सुधीर जाधव यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. “तळागाळातील जनतेसाठी काम करणारे नेतृत्व शिवसेनेत येत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल,” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी जाधव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
स्नेहल जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शिवसेनेची सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, विकासाभिमुख धोरणे आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळेच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. “जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी शिवसेनेत मिळेल,” असे त्या म्हणाल्या. सुधीर जाधव यांनीही पक्ष संघटनेत सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचीदेखील उपस्थिती होती.
जाधव दाम्पत्याच्या प्रवेशामुळे संबंधित भागात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




