ताज्या बातम्या

भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे परिपूर्ण तत्त्वज्ञान – दिनकर झिंब्रे

सातारा(अजित जगताप) – भारतीय संविधान संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे. तिचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे परिपूर्ण तत्त्वज्ञान व बहुसांस्कृतिक वैभव प्राणपणाने जतन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सातारारोड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. गदगकर हायस्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान जागर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य सतीश झांजुर्णे होते. विचार मंचावर ‘जातपीळ ‘ कादंबरीकार जयवंत भिसे, संस्थेचे सचिव व नवयुग वाचनालयाचे संस्थापक जगन्नाथराव फाळके, उपाध्यक्ष संजय शिवाजीराव फाळके, संचालक व नवयुग वाचनालयाचे अध्यक्ष किशोर फाळके, राजेश दोशी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दिनकर झिंब्रे यांनी संस्थेच्या ग्रंथालयास विज्ञानदृष्टीची पुस्तके भेट दिली.
दिनकर झिंब्रे म्हणाले, भारतीय राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य चळवळीतून विकसित झालेला आहे. बहुधार्मिकता व सांस्कृतिक बहुविधता हीच भारताची समृद्ध परंपरा व वैशिष्ट्य आहे. संविधानाची प्रस्ताविका हे मौलिक प्राणतत्त्व आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेपुढे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी केलेले भाषण म्हणजे समताधिष्ठित, शोषणमुक्त समाज निर्मितीचे स्वप्नाचा मौलिक संदेश आहे. भारतीय संविधानाची रचना, वैशिष्ट्ये, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य व इतर तरतुदींची माहिती दिनकर झिंब्रे यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजश्री कदम यांनी केले. श्रीपाद काशीद सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक माधवी साबळे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top