महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. या भूमीला लाभलेला लोककलेचा वारसा अत्यंत संपन्न आहे. तमाशा, लावणी, पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतार आणि गोंधळ यांसारख्या विविध लोककलांनी केवळ मराठी भाषेला शब्दवैभव दिले नाही, तर समाजाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. लोककलेने मराठी भाषेला खऱ्या अर्थाने ‘लोकभाषा’ बनवले. ग्रंथांमधील बोजड शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना लोककलावंतांनी भाषेला लवचिकता दिली.
आज हिच लोककला सातारा येथे आयोजित केलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गावाकुसा बाहेरची झाली. हजारो वर्षांपासून लोक साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषांचे जतन करणारी लोककला या साहित्य संमेलनातून हद्दपार झाली की काय ? अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण ज्या सातारा जिल्ह्यात हे मराठी साहित्य संमेलन होत आहे, त्याच सातारा जिल्ह्याचा इतिहास प्रामुख्याने मराठे शाहीशी जोडलेला आहे. येथील प्रत्येक लोक संस्कृतीचे नाते सांस्कृतिक वैभवाशी जोडले गेलेले आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध म्हणून या जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे. लोककलेच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे कार्य या जिल्ह्यातून झाले आहे. यामध्ये नामांकित शाहीर, तमाशा लावणी कलावंत, लेखक, कवी यांचा मोठा सहभाग होता, हे नाकारता येणार नाही.
सांगली–सातारा साखर पट्ट्यात उसाची फडं जशी पांढऱ्या साखरेची सुवर्णकथा लिहित होती, तशीच या मातीत लोक कलाकरांनी रंग-ताल-लय यांची तेजोमय ज्योत प्रज्वलित करून आपली यशोगाथा सुवर्णाक्षरांनी लिहिली. साखरेची गोडी जशी जिभेवर तरंगते, तशीच येथील लोककलेची ‘शृंगारीक गोडी’ इथल्या मातीशी नातं असणाऱ्या प्रत्येक माणसांच्या हृदयात घर करून बसली आहे, हा इतिहास विसरता येणार नाही. इथली लोककला वाढविण्यासाठी अनेक कलाकारांनी योगदान दिले आहे, याचा विसर अभिजात सारस्वतांना पडला असला तरी इथल्या लोकसंस्कृतीची नाळ जोडलेल्या ग्रामीण भागातील माणूस हे योगदान विसरूच शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. लोकसाहित्यातून लोककला जन्माला आल्या. त्यांनी गावगाड्यातील लोकसंस्कृती जागवली.
शाहीरांचा शाहीर शीघ्र कवी भाऊ फक्कड यांचा जन्म याच सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या छोट्याशा गावातला. त्यांना अनेक भाषा येत होत्या. मराठीतून त्यांनी हजारो कवनं लिहिली. लोकशाहीर पठ्ठे बापुराव यांचाही जन्म तत्कालीन सातारा जिल्ह्यातल्या रेठरे हरणाक्ष गावचा. त्यांनी मराठी भाषेचे अत्यंत सोज्वळ सुंदर आणि जिवंतरूप ‘लावणी’ वाडमय काव्य जगापुढे आणले. पट्ठे बापूराव यांनी अनेक वगनाट्ये लिहिली. त्यातील’मिठ्ठा राणी’ हा त्यांचा गाजलेला वग होता.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगावचा अर्थात पूर्वीचा सातारा जिल्हा. त्यांच्या कांदबऱ्या, लोकनाट्य, वगनाट्य, पोवाडे, लोकगीते, कविता, जग प्रसिद्ध झाल्या. श्रमिक, शोषित आणि दलितांच्या हक्कांसाठी त्यांनी आपल्या लेखणीतून तेंव्हाच्या व्यवस्थेवर प्रहार केला. ते या घटकांचे अग्रदूत होते. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर ह्या सातारा जिल्ह्यातील वाईच्या. त्यांना भारत सरकारने सन 2012 साली पद्मश्री देवून सन्मानित केले. पद्मश्री मिळणाऱ्या या लावणी क्षेत्रातील पहिल्या महिला लावणी कलावंत आहेत. त्यांनी मराठमोळ्या बैतकी (बैठकीची लावणी) लावणी देशभरात पोहचवली. किती मोठे योगदान त्यांनी लावणी वाडमयाला दिले, हे मराठी भाषेतील अभ्यासकांना संशोधन करण्यासारखं आहे.
सत्यशोधक चळवळीचे लोकशाहीर पुंडलिक फरांदे जावळी तालुक्यातील मु. पो. आनेवाडीचे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात गायन करणारे महान शाहीर म्हणून त्यांची ओळख होती. स्फूर्तीगीते, शेतकरी गीते, भारूड, भरली गीते, लोकनाट्ये त्यांनी लिहिली अन आपल्या कला पथकाच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळ उभी केली.
पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे हे वाई तालुक्यातील पसरणी गावचे सुपुत्र. लोककलेत एक दिग्गज शाहीर म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने त्यांनी महाराष्ट्राची एक नवीन ओळख निर्माण करून दिली. मुक्तनाट्य, लोकनाट्ये, प्रहसने, पोवाडे, लोकगीतांनी आपल्या तालावर महाराष्ट्र डोलायला लावला.
अगीनदास उर्फ अज्ञानदास हे पहिले शिवशाहीर, त्यांनी स्वतः प्रतापगडावरच्या पराक्रमाचा पोवाडा लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजदरबारात गायला. तेंव्हा पासून शाहिरी हा कला प्रकार शिवकालीन कला म्हणून ओळखला जातो.
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे मु. पो. मालेवाडी ता. वाळवा हे मूळ गाव. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून घराघरात शिवचरित्र पोहचविले. ‘गड आला पण,सिंह गेला..!’ हा शूर सेनानी तानाजी मालुसरे यांचा पोवाडा त्यांच्या कडून ऐकला असेल, तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. असे थोर शाहीर या सातारा जिल्हा परिसरात जन्माला आलेत.
लोकभाषेतून लोकरंजनाच्या माध्यमातून लोकशिक्षण देण्याचे काम तमाशाने केले. तमाशा हा लोकरंगभूमीवरील कलात्मक अविष्कार. शाब्दिक विनोद, द्विअर्थी संवाद, आध्यात्मिक रचना, शृंगारिक लावण्या, कथात्मक वगनाट्ये या ग्रामीण भागात मनोरंजन करणाऱ्या तमाशाला लोकाश्रय मिळाला. तमाशातील ‘मोहना बटाव’ हा पहिला पद्यात्मक वग या भागातील उमा- बाबाजी सावळजकर (पेडकर) यांनी 1865 साली लोकरंगभूमीवर आणला. अन् तेथून खरी तमाशाच्या आकृतीबंधाला सुरुवात झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने या साखर पट्ट्यात लोकरंगभूमी उदयास आली ती लोकाश्रयामुळे.
साताऱ्यातील रामाकुंभार वर्धनगडकर यांच्या तमाशाने पहिला ‘राजा हरिश्चंद्र’ हे वगनाट्य लोकरंगभूमीवर आणले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. धोंडीराम वस्ताद शिरढोणकर, बापूराव शिरढोणकर, शिवा-संभा संभा कौलापूरकर, लहू-अंकुश कौलापूरकर (काळू-बाळू), श्यामराव पाचेगावकर, जयवंत बाबू सावळजकर, विश्वासराव व साहेबराव नांदवळकर, कांताबाई सातारकर, शंकरराव तिसंगीकर सह चंद्रा तिसंगीकर, मारुती कवठेकर, गुलाबराव बोरगावकर, गणपतराव व्ही माने, अगदी राष्ट्रपती सुवर्णंपदक सन्मानित मंगला बनसोडे करवडीकर यांनी तमाशाच्या माध्यमातून लोककलेत आपले मोलाचे योगदान देवून मराठी लोकलोकसाहित्य आणि लोक संस्कृती जिवंत ठेवली. तमाशा कलावंतांनी हीच मराठी भाषा आपल्या ग्रामीण आणि रसाळ भाषेत सादर केली. ती लोकांना सोप्या पद्धतीची वाटली. म्हणूनच मराठी भाषा संवर्धन आणि जतन करण्यासाठी तमाशा आणि लावणी कलावंतांचाही मोठा सहभाग होता. हे सारस्वतांच्या शब्दप्रभुंनी लक्षात ठेवायला हवे.
सातारा येथे दिनांक 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात सुरु होत आहे. ज्या भागात हे संमेलन आयोजित करण्यात आले.त्या मातीतील लोककला व लोकसाहित्यावर परिसंवाद आयोजित करण्यास साहित्य महामंडळाचे आयोजक शिक्कामोर्तब का करीत नाहीत, म्हणजेच हा लोकसाहित्य लोकसंस्कृतीवर भाषाप्रभुंनी घातलेला घालाच आहे. अवघ्या महाराष्ट्राची जडण घडण लोकसाहित्याने केली. त्या लोकसाहित्याला छेद देवून अभिजात. साहित्याची मांदियाळी होत असे तर याचा गांभीर्याने. विचार करोडो रुपये अनुदान देणाऱ्या सरकारने सुद्धा करावा.
यापुढे मराठी साहित्य संमेलन किंवा मराठी नाट्य संमेलन ज्या जिल्ह्यात असेल तेंव्हा त्या जिल्ह्यातील पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण पुरस्कार किंवा मानाचे पुरस्कार प्राप्त असलेल्या कलावंतांच्या कार्याला उजाळा मिळेल असे सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम या संमेलनात आयोजित झालेच पाहिजेत, अशी अट मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाने करोडो रुपये अनुदान देतांना संबंधित आयोजकांना घातली तरच, या लोकसाहित्याची हेळसांड होणार नाही.
32 वर्षानंतर साताऱ्यात मराठी साहित्य संमेलन होत आहे. मात्र या साहित्य संमेलनात लोकसाहित्य लोककला यावर एकही परिसंवाद दिसत नाही. यावर खुली चर्चा का होत नाही. जागरण-गोंधळ, धनगर नृत्य, शाहिरी, तमाशा, लावणी, लोककथा सांगणारे वाघ्या मुरळी, वासुदेव, नंदी बैलवाले, कुडमुडे ज्योतिषी, जात्या वरच्या ओव्या, बहुरूपी, करपल्लवी ह्या लोककला आज काळाच्या ओघात लोप पावत चालल्या आहेत. मग या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या लोक संस्कृतीचे दर्शन साहित्यिकांना का होत नाही. या प्रश्नाचे उत्तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांना आपल्या भाषणात द्यावे लागणार आहे. कारण त्यांची नाळ ही लोकसाहित्य आणि लोककलेशी जोडलेली आहे. संमेलनाच्या अध्यक्ष पदावर त्यांची निवड झाल्यानंतर लोकसाहित्य आणि लोककला क्षेत्रात खूप अपेक्षा वाढल्या होत्या. कारण लोककला आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांचे खूप अतूट नाते आहे. अन् त्यांच्या कार्यकाळात लोककला गावकुसा बाहेर जात असेल तर हे लोककलावंत आणि लोकसाहित्याचे हे दुर्दैव ठरेल.
आजच्या डिजिटल युगातही लोककलेचे महत्त्व कमी झालेले नाही. ही लोककला मराठी भाषेचा कणा आहे. तिने भाषेला ओघवते केले आणि समाजाला आरसा दाखवला. जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत ढोलकीचा ताल आणि तुणतुण्याचा आवाज घुमत राहील, तोपर्यंत मराठी भाषा आणि संस्कृतीची पताका दिमाखात फडकत राहील.
*-खंडूराज गायकवाड khandurajgkwd@gmail.com. (लेखक मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार असून लोककलेचे गाढे अभ्यासक आहेत.)*




