प्रतिनिधी : धारावी परिसरात शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले स्वर्गीय मुतु तेवर यांच्या काळात शिवसेनेची पकड मजबूत होती. शिवसेनेकडून त्यांना विविध जबाबदाऱ्या व पदे देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे धारावीत शिवसेनेचा प्रभाव लक्षणीय होता. मात्र मुतु तेवर यांच्या निधनानंतर ही पकड हळूहळू सैल होत गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून शिवसेना (ठाकरे गट) मध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे त्यांच्या पत्नी व शिवसेना (ठाकरे गट) च्या माजी नगरसेविका मरियाम्मल मुतु तेवर नाराज झाल्या. तिकीट निश्चितीबाबत समाधान न झाल्याने त्यांनी अखेर काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत मरियाम्मल थेवर यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष व लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मरियाम्मल थेवर यांच्या सामाजिक व राजकीय अनुभवाचा लाभ काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस निश्चितच होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे धारावीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून, धारावीत शिवसेनेला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत धारावीतील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.




