कराड(प्रताप भणगे) : काही दिवसांपूर्वी महावितरण विभागामार्फत नवीन विद्युत पोल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. या कामादरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांची परवानगीशिवाय तोड करण्यात येत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.
तक्रारीनंतर पाहणी केली असता, अनेक ठिकाणी विद्युत पोल रस्त्याच्या साईट पट्टीतच उभारण्यात आल्याचे तसेच काही ठिकाणी डॅम व पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध पोल उभे केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक वहनास अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, उभारलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही नागरिकांनी केला होता. या सर्व बाबींमुळे संबंधित काम काही काळासाठी थांबवण्यात आले होते.
मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसताना आता पुन्हा एकदा वृक्षतोड सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ही वृक्षतोड अधिकृत परवानगीने सुरू आहे की विना परवानगी, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रसिद्धीपत्रक संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आलेले नाही.
या वृक्षतोडीमुळे रस्त्यालगतची नैसर्गिक सावली पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असून, त्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या अशा कारवाईकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्पष्ट भूमिका व कारवाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.




