मुंबई (रवींद्र मालुसरे) : बेघरपणा हा समाजातील उपेक्षिततेचा सर्वात वाईट प्रकार आहे. अत्यंत गरिबी, उच्च पातळीची असमानता आणि भेदभाव ही बेघर होण्याची प्राथमिक कारणं आहेत.
बालपणच हरवून बसलेली, दुर्बल स्तरातली मुलं लहान वयात विविध कारणांमुळे घरापासून दुरावलेली असतात, स्टेशन किंवा फुटपाथवर राहणारी, पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारी जगण्यासाठी पावलोपावली जीवघेणा संघर्ष करणाऱ्या या मुलांना मानसिक आधार, सर्व मानवी हक्कांपासून दूर होऊ न देणं, त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आणि त्याचबरोबर त्याला डोक्यावर छप्पर देणं असं सामाजिक कणव असलेले काम
जीवन संवर्धन फाउंडेशनच्या वतीने गेली अनेक वर्षे होत आहे. वझे उत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत “स्नेहाची साथ मदतीचा एक हात” हा विशेष उपक्रम नुकताच यशस्वीरीत्या राबविला आहे, या माध्यमातून संस्थेच्या कामाची माहिती आम्हाला जवळून घेता आली. सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून जगण्यातला आनंद हा नाव, पैसा, प्रसिद्धी, लौकिक ह्याच्या पलीकडे अनुभवायचा असेल तर ह्या लेकरांकडे बघून तो घेता येतो आणि आपण किती सुखात राहतो तरीही तक्रारी करत फिरतो ह्याची वारंवार आठवण होत राहते. अशी भावना प्रा. निकिता माने यांनी
व्यक्त केली. वझे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. (डॉ.) प्रिता निलेश तसेच व्यवस्थापन सचिव मा. डॉ. बी. बी. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली “जीवन संवर्धन फाउंडेशन” गुरुकुल संचलित, म्हस्कळ, टिटवाळा, जिल्हा ठाणे या संस्थेला भेट देण्यात आली. त्या पुढे असेही म्हणाल्या की, आमच्याकडून काही भेटवस्तू देण्यात आल्या परंतु वस्तूंच्या देवाणघेवाणपेक्षा देश तिसरी महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रगती करीत असला तरी समाजातला हा एक गंभीर आजार खोलवर रुजला आहे, त्याची व्यापकता आणि संस्थेचे सेवाभावी कार्य यनिमित्ताने आम्ही समजून घेऊ शकलो. त्याचबरोबर माणुसकी, आपुलकी,सामाजिक जबाबदारीची जाणीव व्यक्त करणारे अल्पसे कार्य आमच्या हातून घडले. शिक्षणमहर्षी भाऊसाहेब वझे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी आणि त्यातून
राष्ट्रकार्यासाठी सदैव सामाजिक सजग भान जपणारा नागरिक घडावा याहेतूने शिक्षण संस्था काढली. आम्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सामाजिक जाणीवा वाढविणारे अत्यंत प्रेरणादायी आणि संवेदनशील काम आज घडले. “वझे उत्सव” हा नुसता स्पर्धाचा कार्यक्रम नाही तर त्यातून संस्कृतीचे मूल्य वाढवणारा महाविद्यालयीन कार्यक्रम घडला याचा आज आम्हाला आनंद होत आहे.
मुलुंड येथील केळकर शिक्षण संस्था संचलित विनायक गणेश वझे महाविद्यालय (स्वायत्त) येथे सालाबाद प्रमाणे वझे-उत्सव २०२५- २६ हा उपक्रम दि. २७ नोव्हेंबर २०२५ ते दि. २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवा अंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आणि या स्पर्धांना विविध महाविद्यालयांतून दरवर्षी प्रमाणे उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी श्री. दिलीप पवार आपले विचार मांडताना म्हणाले की, विज्ञानवादी दृष्टिकोन, कला, एकत्र खेळ, चिकित्सक, विजिगीषु वृती आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे आपण सर्वच माकडांपासून माणसात आलोय. एकमेंकांची साथ देणं, घेणं आणि सामाजिक जाणिवेतून समाज घडतो याचे भान राखणे हे महत्वाचे आहे. मानवी उत्क्रांतीचा पाया अशा प्रायोरिटी कळण्यातूनच सूरू होतो. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात…! वझे उत्सव कमिटीने याच भावनेने मनाला समाधान देणारा कार्यक्रम केला.
यावेळी “जीवन संवर्धन फाउंडेशनच्या” वतीने चालविण्यात येणाऱ्या बेघर अनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आवश्यक गरजे नुसार २० बेंचेस,टी व्हि संच, शुद्ध थंड / साध्या पाण्याचा कुलर, ब्लँकेट्स, टी-शर्ट्स तसेच मिठाई देण्यात आली. हा सामाजिक उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी महाविद्यालयाचे अधिक्षक श्री. संतोष डगळे तसेच वझे उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री. गोविंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी उल्लेखनिय काम केले. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे व समन्वयामुळे आणि केळकर-वझे महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी परिवारामुळे हा प्रेरणादायी उपक्रम अत्यंत नियोजितरित्या, शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पडला.




