ताज्या बातम्या

उद्धव- राज ठाकरे पक्ष युती… बाळासाहेब, काय बोलले असते… ———– ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार- संपादक)

राजकारणाला अनपेक्षित वळण देणारी एखादी घटना घडते; आणि “अशक्य वाटणाऱ्या गोष्टी” सहज साध्य होतात! तशी शक्यता उद्धव- राज ह्या ठाकरे बंधूंच्या “शिवसेना- मनसेना युती”ने महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांत निर्माण केलीय. ही युती २४ डिसेंबर रोजी “पत्रकार परिषद”मध्ये जाहीर करण्यापूर्वी दोघांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन सहकुटुंब प्रतिमेचं पूजन केले. ते पाहताना माझ्याप्रमाणे लाखो लोकांच्या मनात आले असेल, “आज बाळासाहेब ठाकरे असते, तर ते काय बोलले असते?” काळाचे घड्याळ “जर- तर”च्या चाव्या मारून उलटे फिरवता येत नाही. पण प्रतिभेला थोडी चालना दिली, तर अशा प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. कारण, अशा उत्तरातून लोकभावना व्यक्त होते. जनतेची मानसिक कोंडी फुटते. क्षणात वर्तमान बदलते. “आज बाळासाहेब ठाकरे असते तर?”…. तर त्यांनी “शिवसेना- मनसेना युती” शिवतीर्थावर भव्य सभा घेऊन जाहीर केली असती आणि आपल्या भाषणात बोलले असते….
——————-

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,(टाळ्या)….. आणि खास करून मराठी माता – भगिनी आणि बंधूंनो! (प्रचंड टाळ्या) तसा मी तुम्हाला नेहमीच हृदयापासून भेटत असतो. अहो, तसाच भेटणार ना! तुम्हीच मला तुमचा “हृदयसम्राट” बनवलंत ना! (टाळ्या… आणि घोषणा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… विजय असो!) माझा विजय असो ठीक आहे… पण तो फक्त माझाच नको! येत्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण- डोंबिवली, पुणे आणि जिथे शक्य असेल तिथे “शिवसेना- मनसेना युती”चा विजय झाला पाहिजे! (पब्लिकमधून आवाज : होणार! होणार!) नुसतं “होणार! होणार!” नको मला, तसं वचन द्या! (घोषणा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… विजय असो!) आपल्याला सगळे मतभेद विसरून देशाची राखण करणारा महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे! मुंबईसह सर्वत्र विजय मिळवून तिथे मराठी महापौर बसवायचा आहे! त्यासाठीच तर राज- उद्धव यांनी आपल्या पक्षांसह एकत्र आलेत ना!(पब्लिकमधून “हो हो”चा पुकारा. त्यांना हाताने थांबवत. थोड्या कडक आवाजात बाळासाहेब बोलतात -) मी तुम्हाला नाही, राज- उद्धवला विचारतोय! (हशा. दोघेही बाळासाहेबांच्या सूचनेनुसार पुढे येतात आणि हातात हात घालून समोरच्या जनसागराला अभिवादन करतात. पब्लिकमधून घोषणा : बाळासाहेब ठाकरे यांचा… विजय असो!) चला, आता त्यांनी त्यांचं आणि मी माझं काम केलं. घरच्या लग्नाला बाहेरचा भटजी कशाला हवा? (हशा) मंगलाष्टका काय, कोणीही म्हणू शकतो. पण, दोघांचं जुळवणारा खमक्या हवा ना! ते काम आमच्या संजयने (राऊत) चोख केलं. (प्रचंड टाळ्या) ह्याने सहा वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी “राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेस आणि शिवसेना” अशी युती घडवून आणली. उद्धव मुख्यमंत्री झाला. त्यावेळी वडील म्हणून मला आणि भाऊ म्हणून राजला निश्चित आनंद झाला. असाच आनंद तुम्हालाही झाला. बरं!… तर सांगत काय होतो, तर संजयचा पराक्रम!… अशक्य ते शक्य, करतील संजय- स्वामी!असा हा पराक्रम आहे! (प्रचंड टाळ्या)

उद्धव- राज एकत्र यावेत, असे तुमच्याप्रमाणे मलाही वाटत होते. पण त्यासाठी वेळ यावी लागते. ती वेळ अन्यायाचा अतिरेक होईपर्यंत टाळली जाऊ नये, हे खरे! पण तसे झाले म्हणूनच ६० वर्षांपूर्वी “शिवसेना”चा जन्म झाला ! (घोषणा : शिsssवसेना… झिंदाबाद!) तर विषय काय होता?… नोकऱ्यांत भूमिपुत्रांवर अन्याय! मराठी भाषेची गळचेपी! ह्या अन्यायाविरोधात हिमतीने उभे राहिलो. जातीपातीभेद गाडून टाकून मराठी माणूस म्हणून लोकांना उभे केले. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाची आणि भगव्या ध्वजाची कमाल दाखवत मराठींवरचा अन्याय मोडून काढला. (टाळ्या आणि घोषणा) तेच ऐतिहासिक काम यावेळी “मराठी भाषा केंद्राच्या” दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. त्यांनी पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून “हिंदीसक्ती” लादण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात करावं आंदोलन उभं केलं. त्यातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्र शासनाचा डाव उघडा पाडला आणि शासनाला “हिंदीसक्ती”चा अध्यादेश मागे घ्यायला लावला. दीपक पवार आणि सहकाऱ्यांच्या जागरूकतेला आणि मराठी भाषा रक्षणाच्या व्यापक कार्याला माझा आणि माझ्या ‘शिवसेने’चा मानाचा मुजरा! (प्रचंड टाळ्या) हे “हिंदीसक्ती” विरोधी आंदोलनच उद्धव- राज यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह जवळ आणण्यास निमित्त ठरले. (टाळ्या)

मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या, असे जगभरातील भाषा आणि मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी आपल्याला माय माउलीची भाषा मराठी आणि दुसरी जगाची ज्ञानभाषा असलेली इंग्लिश भाषा पुरेशी आहे. हे चाललेत हिंदी शिकवायला. आपली मराठी हजार वर्षे जुनी आणि तिच्या डोक्यावर तुम्ही पाच- सहाशे वर्षांपूर्वीची हिंदी ठेवणार? पोरांनी काय शिकायचं? इयत्ता म्हणायची की कक्षा? यातील शिक्षा म्हणजे दंड की शिक्षण? विमान की हवाई जहाज? ससा की खरगोश? मुलांना “कमळ” म्हणू द्या. “कमल” हे आपल्याकडे मुलीचे नाव असत. हे समजून घ्यायला मुलांची मराठी भाषा आधी पक्की होऊ द्या! मुलांना कलिंगड शिकू द्या. टरबूज शिकवू नका. त्याला माहीत आहे, टरबूज कशाला म्हणतात ते! (जोरदार हशा आणि टाळ्या)

महाराष्ट्राच्या हिताच्या मुळावर येणाऱ्या हरामखोरीच्या विरोधात कितीही बोला; ह्या प्रवृत्ती काही केल्या सुधारत नाहीत. महाराष्ट्राच्या वाटेत सारखं काळ्या मांजरासारखं हे लोक आडवे येतात आणि नको ती लुडबुड करतात. गेली साठ-सत्तर वर्षे हेच सुरू आहे. मांजर आडवं येऊन लुडबुड करू लागलं की, धपाटी घालावीच लागते. आता अशा प्रकारचं वातावरण मुद्दामहून तयार केलं जातं. त्यामुळे “हमारी बिल्ली हमपर म्याऊं करती रहती है!” (टाळ्या) आता तुम्ही म्हणाल, ही हिंदी कुठून आली. अरे, आमचा हिंदीला विरोध नाही रे माकडांनो! त्या हिंदीच्या मागच्या लबाड कारस्थानाला विरोध आहे. (टाळ्या)
बरं ! तर मी सांगत होतो, ते काळ्या मांजराचं ! हे काळं मांजर कोण ते तुम्हाला माहीतच आहे. रूप बदलत आलंय. ७० वर्षांपूर्वी ते मोरारजी देसाई आणि स.का. पाटलाच्या रूपात आलं होतं. आता त्या मांजरानं कमळाबाईच्या पोटी जन्म घेतलाय. गेली दहा-बारा वर्षे तिचा धुमाकूळ सुरू आहे. ह्या चार पायाच्या अवदसेने देशात, राज्यात, मुंबईत लोकांचे जगणे, वावरणे मुश्कील करून टाकले आहे. त्याला काही अंशी तुम्ही- आम्हीपण जबाबदार आहोत! ह्या चार पेठा आणि चार उपनगरांमध्ये असणाऱ्या उठवळ कमळाबाईला आम्ही, मुंबईकरांनी, महाराष्ट्राने जवळ केलं. त्यात आपली काय चूक झाली, ते मागंच तुम्हाला सांगितलंय. आजचा विषय – कमळाबाईच्या मांजरीनं तुमच्या- आमच्यापुढं काय वाढून ठेवलंय त्याबद्दल बोलू! ह्या कमळीच्या मांजराला सगळंच हवं! देश हवा, राज्य हवं आणि मुंबईपण हवीय! म्हणून तिची रोज नवनवीन नाटकं सुरू असतात. ‘पहिलीपासून सक्तीने हिंदी’ हेही नाटकच होतं. खरी भूक सत्तेची आणि सत्तेवरील एकाधिकाराची आहे. पुराणातल्या “मनुचा मासा” कसा ओंजळ, घंगाळ, विहीर, नदी, समुद्र इथपर्यंत मोठा झाला; तसा ह्या मांजरीचा अवतार आहे. (पब्लिकमधून आवाज येतो; “ती माजोरडी आहे!” बाळासाहेब त्यादिशेने बघत म्हणतात) बरोबर बोललात! पण काळजी करू नका. तिचा माज जिरवायच्या तयारीनेच इथे उद्धव- राजचे लाखो कार्यकर्ते आले आहेत. तुम्ही हे सत्कार्य करण्यासाठी एकत्र आल्यामुळे तुमच्या मागे महाराष्ट्र उभा राहील. तुम्हाला यशस्वी करील. (जोरदार टाळ्या)

ह्या मांजरीला आपली मराठी आणि आपला महाराष्ट्र मुंबईसह टिकविण्यासाठी आपण काय काय खस्ता खाल्ल्यात, त्या माहिती नाही. १०७ लोकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतरच हे मराठी राज्य निर्माण झालंय. भारताने ५५ कोटी रुपये दिल्यावर पाकिस्तानची निर्मिती झाली ; तसेच, मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती आपण गुजरातला ६० कोटी रुपये दिल्यावर झाली आहे. मुंबईवरच्या दाव्याचा सोक्षमोक्ष लावावा, म्हणून ही भरपाई तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी दिली आणि मगच मुंबई मराठी माणसाची झाली. तरीही कधी गुजराती – जैनांची कबुतरं उडवून; तर कधी हिंदी भाषेच्या आडून, मुंबईकडे वक्रदृष्टी टाकली जाते. हा मुंबईवर रोखलेला वाकडा डोळा फोडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही! (प्रचंड टाळ्या) काय तर म्हणे, लोकांनी अधिकच्या भाषा शिकल्या पाहिजेत. अरे पण हा प्रयोग महाराष्ट्रातच का? देशात अन्य कुठल्याच राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून “हिंदी सक्ती” नाही. ती महाराष्ट्रातच का? आयला, लोकांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दाम नाही. घरात – रस्त्यावर पोरीबाळी सुरक्षित नाहीत. इथले उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. मुंबईची तर अक्षरशः वाट लावायचे काम सुरू आहे. हे वाट लावायचे काम बिनबोभाट पार पडावे, म्हणून हे सगळे सुरू आहे.

पेपर वाचता ना? (पब्लिक : हो!) ते सोशल मीडिया बघता ना? (पब्लिक : हो!) त्यात येत असतं. धारावी अदानीला दिली. अमुक एक झोपडपट्टी फदानीला दिली. तमुक सरकारी जागा चोदानीला दिली.(हशा) सगळा डोळा मालावर आहे. अरे, तुम्ही कसलं करताय झोपडपट्टी पुनर्वसन? ह्या मुंबईला झोपडपट्टी मुक्त करायचं हा पहिला संकल्प ‘शिवसेने’ने ३० वर्षांपूर्वी केलाय. ही कल्पना आमची! इथल्या मराठी माणसाला इथंच मुंबईत राहू द्यायचा, आमचा निर्धार होता. पण तुमची नियत त्याला देशोधडीला लावायची आहे. मराठी माणसाला हद्दपार करून पैसेवाल्यांसाठी आलिशान फ्लॅट निर्माण करायचे, हे तुमचे कारस्थान आहे. त्यासाठीच काही चार पायांची भटकी, भणंग जनावरं वापरली जात आहेत. आम्ही काही माकडांची माणसं केली होती. पुढे ते सरदार झाले. पण ते गद्दार निघाले! (टाळ्या) आता ते कमळीची पालखी उचलायचं काम करतात.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे अवसान पूर्वी मोरारजी देसाई आणि स.का. पाटील यांनी दाखवले होते. तेच अवसान कमळाबाईच्या पोटी निपजले आहे. म्हणूनच २०१४ साली देशात “मोदी सरकार” येताच कमळीने ‘शिवसेने’बरोबरची २५ वर्षांची युती तोडली. केंद्रातल्या सत्तेच्या बळावर राज्य काबीज करायचे आणि ते राज्य दिल्लीची गुलामी मनोभावे स्वीकारणाऱ्याच्या हाती द्यायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे. उद्धव मुख्यमंत्री असतानाच मोदी- शहाला मुंबई अदानी- चोदानीच्या घशात द्यायची होती. ते शक्य झाले नाही. म्हणून ते शक्य करण्यासाठी कमळीने मी तळहाताच्या फोडासारखी जपलेली तुमची- आमची “शिवसेना” फोडली. शरद पवारांची “राष्ट्रवादी काँग्रेस” फोडली. तरीही तिची भूक भागत नाही, म्हणून माणसं फोडली जाताहेत. रस्त्यावर सोडलेली कोंबडी कशी काहीही खाते. खडे खाते, काच खाते, कापड खाते, शेण खाते, शेणातले किडे खाते. नेमकं तसंच कमळाबाईचं आहे. मिळेल ते खाते आणि कुठेही शिटते. म्हणजे बसते नाही… हागते! (हशा) ह्या कमळीला कशासाठी एवढे लोक लागतात; हे तिलाच आणि तिच्याकडे जाणारांना माहीत!

कमळीने कितीही पक्ष फोडून कितीही चार पायाची माणसं पळवू दे आणि पाळू दे. लवकरच तिचा हा सत्तामाज जनताच मतदानातून उतरवणार आहेत. त्याची सुरुवात झाली आहे. याद राखा कमळाबाईच्या पोरांनो! तुम्ही वाघाच्या शेपटीवर पाय देऊन आग असलेल्या मराठी अस्मितेशी खेळत आहात. आता तुमचीही हालत स. का. पाटील, रजनी पटेल आणि मोरारजी देसाई सारखीच होणार आहे. राज आणि उद्धव, तुम्हा दोघांना सांगतो. आपलं- तुमचं काय असेल ते तुमच्यात राहू द्या. प्रथम तुमच्या भोवतीचे बडवे हटवा. बघा, तुमच्या प्रमाणेच “शिवसेना- मनसेना” कार्यकर्त्याची युतीही भक्कम होईल! (टाळ्या) त्या जोरात कमळीची समाधी महाराष्ट्र राज्याच्या कुरुक्षेत्रावर बांधा. वाजत-गाजत मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका जिंका! त्याशिवाय, मी स्वर्गीय सुखाचा आनंद घेणार नाही!!
जय हिंद! जय महाराष्ट्र! (प्रचंड टाळ्या)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top