सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती व बदल्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या आवारात मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांनी गर्दी केली . या शिक्षकांनी नियुक्त बदलीसाठी दिलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करूनच त्यांना पत्र दिले जाईल अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांनी दिली आहे
एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता असल्यामुळे सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची शासकीय सेवेतील बदली व नियुक्ती दिली गेली नाही. आता प्राथमिक शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसाचा अवधी असतानाच सातारा जिल्हा परिषदेने आंतरजिल्हा व जिल्हातर्गंत बदलीप्राप्त शिक्षकांना शाळा व नियुक्ती आदेश देण्यासाठी काहींनी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, दिव्यांग यासारख्या आरक्षणातील शिक्षकांची कागदपत्रे पडताळणी करुनच इतर जिह्यातील बदली प्राप्त शिक्षकांना सातारा जिह्यात सोडण्यात आले नव्हते. गेल्या सहा दिवसांपासून इतर जिह्यातून अशा प्रवर्गातील शिक्षकांना सोडण्यात येत असून त्यांना नियुक्ती आदेश देण्यासाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरु केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरु होण्यापूर्वी त्यांना संबंधित शाळेत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे . ज्ञानदान करण्यासाठी अनेक शिक्षक इच्छुक असून काहींनी चक्क दुर्गम भागात सुद्धा काम करण्याची तयारी ठेवलेली आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांनी दिली आहे. दुर्गम भागातील दोन विद्यार्थी असलेल्या शाळेत पट वाढवण्याची तयारी अशा शिक्षकांनी केली आहे त्यांचे मनापासून कौतुक होत आहे.