कराड(प्रताप भणगे) : उंडाळे–येवती कॉर्नर रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे आज पुन्हा एक मोठा अपघात टळला. भल्या मोठ्या १६ टायर ट्रकचा टायर खोल खड्ड्यात अडकल्याने फुटला आणि उडालेल्या दगडामुळे मागून येणाऱ्या व्यक्तीचा डोळा थोडक्यात बचावला. प्रत्यक्षदर्शी सांगतात—“क्षणभरात जीव जाण्याची वेळ आली होती!”
ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, नागरिकांचा संताप उसळला आहे. १ ते २ फूट खोल झालेल्या या खड्ड्यातून १०० ते २०० हैवा ट्रक ये-जा करतात. यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, सामान्य नागरिकांची अक्षरशः फरफट होते. रोज ५ ते १० अपघात होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी रस्ता रोको करून आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने तात्पुरता सिमेंट पॅच टाकला. पण काही दिवसांतच तो पुन्हा खड्डामय झाला. तोच जर योग्य प्रकारे डांबरीकरण झाले असते, तर आजचा अपघात टळला असता. उलट तात्पुरत्या मुरूम–दगडी भरावामुळेच आज ट्रकचा टायर फुटल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
नागरिकांचे स्पष्ट शब्दांत प्रश्नचिन्ह:
या कॉर्नरची अशी दुरवस्था का झाली?, कुणामुळे झाली?, दुर्लक्ष कोणाचे?, याची जबाबदारी कोण घेणार? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने चाललेल्या निष्क्रियतेमुळे येथील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. दुचाकीचालकांसाठी तर हा रस्ता जीवघेणा ठरत असून, रोजच्या रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी इशारा
पुढील दोन दिवसांत या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. उंडाळे–जिंती परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाला थेट सवाल—
आणखी किती अपघात झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे. याचे उत्तर देणार आहात की अजून जीव जावेत असे तुम्हाला वाटत आहे.




