प्रतिनिधी : महाबोधी महाविहारावर बौद्धांचाच हक्क असून बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजासाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे सर्वोच्च केंद्र आहे. या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडेच असले पाहिजे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा १९४९ तत्काळ रद्द करा आणि बौद्ध समाजाला त्यांचे संपूर्ण हक्क परत द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
महाबोधी महाविहार प्रश्नी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यान महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाबोधी महाविहारासाठी देशभरात आंदोलन सुरु आहे. विविध संघटना व पक्षीय पातळीवर हे आंदोलन सुरु आहे. या विषयावर संसदेत आवाज उठवलेला आहे. यापुढेही या प्रश्नावर संसदेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही आवाज उठवत राहू. देशाच्या पंतप्रधांनानाही याविषयावर भेटू पण जोपपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरुच राहिल. देशात मनुवाद वाढला आहे, सरन्यायाधीशांवर कोर्टात हल्ला होतो पण त्या हल्लेखोराला शिक्षा न करता त्याला पाठीशी घातले जात आहे. पंतप्रधान मोदी परदेशात असले की गौतम बुद्ध, महात्मा गांधी व संविधानाचा उल्लेख करतात पण देशात मात्र संविधानाची पायमल्ली केली जात आहे. दलितांवर हल्ले होत आहेत, हरियाणात आयपीएस अधिकाऱ्याला आत्महत्या करावी लागली हे गंभीर आहे असेही खासदार गायकवाड म्हणाल्या. या आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह प्राणिल नायर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हाध्यक्ष कचरू यादव, क्लाईव्ह डायस, इंदुप्रकाश तिवारी, अवनीश सिंग, आनंद यादव, विष्णू सरोदे, मंदार पवार इत्यादी उपस्थित होते.