Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्र"कोकणचा साज,संगमेश्वरी बाज" लोकनाट्याचा पार्ल्यातील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रयोग

“कोकणचा साज,संगमेश्वरी बाज” लोकनाट्याचा पार्ल्यातील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रयोग

मुंबई (शांताराम गुडेकर) : बोली भाषेमधील गोडवा आगळाच असतो.प्रमाणभाषेची गरज मान्य करूनही त्याचे सतत तुणतुणे वाजवणा-यांना बोलीभाषेचा गोडवा कळत नाही. त्यातील थेट भाव आणि व्यक्तहोण्याचा रोखठोकपणा शिवाय लडिवाळपणा ही गंमत असते. ‘संगमेश्वरी बोली’मध्ये हे सारे एकवटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ते खेड भागातील या बोलीभाषेला तसे दुय्यमच मानले जात होते. मात्र, आधी आनंद बोंद्रे यांच्या एकपात्री प्रयोगातून आणि आता ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाटय़ातून ही बोली प्रवाही होते आहे. याच संगमेश्वरी बोलीतून जाकडी,नमन,भजन अशा कोकणी लोककला लोकनाटय़ाच्या फॉर्ममधून सादर करणा-या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ लोकनाटय़ाने अवघ्या तीन वर्षात ४५० हुन अधिक प्रयोग सादर केले आहेत.कोकणी लोककलेचा हा ख-या अर्थाने सन्मानच म्हणावा लागेल.

कोकणला मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.निसर्गसौंदर्य,आंबा, काजूसारखी फळे, अनेकविध सण, उत्सव, प्रथा यांच्यासोबत बोलीभाषा ही कोकणची वैशिष्टय़े आहेत. विशेष उल्लेख करता येईल तो ग्रामीण ढंगाच्या संगमेश्वरी बोलीचा. समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या टीमने ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाटय़ाची निर्मिती करताना संगमेश्वरी भाषेला लोकमान्यता मिळवून देण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. तात्या गावकर हा या कथासूत्राचा तथा लोकनाटय़ाचा प्रमुख आहे.कोकणातील लोककला, संस्कृती जाणून घेऊन त्यावर ‘डॉक्युमेंटरी’ करण्याच्या इराद्याने येणारा मुंबैकर गावातील इरसाल पात्रांना कसा सामोरा जातो, हे पाहणे खूपच मजेशीर आहे. विविधरंगी पात्रांच्या संगतीने मुंबैकर गावातील प्रथा, परंपरा, कला, संस्कृती जाणून घेताना भारावून जातो. विनोदी संवादांतून कोकणातील लोकांच्या मनातील सलही तात्या गावकर आणि मंडळी लोकांपुढे मांडण्यात यशस्वी झाले आहेत. बक्कळ पैसा कमावण्याच्या ओढीने गावातील तरुण मंडळी मोठय़ा शहरांकडे धावतेय.
त्यामुळे गावातील संस्कृती, कला लोप पावतेय की काय,ही प्रबोधनात्मक संवादांतून प्रखरपणे मांडलेली ही गावक-यांची मनातील भीती अंतर्मुख करून जाते. गावातील जमीनजुमला येईल त्या किमतीला विकून पैसा कमावण्याचा फंडा सध्या सर्वत्र आहे. मात्र, त्याच जमिनीवर उभ्या राहणा-या उद्योगावर मजुरी करण्याची पाळी स्वत:वर येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती करताना ही गावकर मंडळी भविष्यातील कोकणाचे भयान रूपच जणू रसिकांसमोर मांडतात आणि सगळे स्तब्ध होतात.

‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ला मुलुंड येथे झालेल्या ९८ व्या मराठी नाटय़ संमेलनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले. त्यावेळी उपस्थित रसिक आणि कलावंतांनी उभे राहून या टीमला दाद दिली कौतुक केले.त्यानंतर कोकणमध्ये एका पाठोपाठ एक प्रयोगांचा सिलसिला सुरू झाला.तीन – चार वर्षात सुमारे ५२५ हुन अधिक प्रयोगांचा टप्पा गाठणा-या या लोकनाटय़ाचा पहिला व्यावसायिक प्रयोग परळ (मुंबई) येथील दामोदर हॉलमध्ये मुंबईकर रसिकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात झाला.त्या नंतर सतत मुंबई सह कोकण आणि अन्य भागात पुढील काही प्रयोग होणार आहेत.मुंबईकर कोकणवासीयांनी या लोकनाटय़ाचे कौतुक केले आहे.

कोकणी लोककला टिकाव्यात.त्या नव्या पिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात.बोलीभाषा टिकावी.तसेच भाषा बोलण्याचा संकोच दूर व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन ह्या लोकनाट्य मधील तात्या गावकर,उत्तम गायक/कलाकार सुनील बेंडखळे यांनी केले आहे.म्हणूनच या दर्जेदार प्रयोगाचे आयोजन अर्चना थिएटर्स निर्मित,श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व कलाप्रेमी व्यक्तीमत्व तसेच शक्ती -तुरा,नमनचे प्रयोग हाऊसफुल्ल करणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार श्री.दिपक धोंडू कारकर आयोजित शुक्रवार दि.१० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रौ ०८ : ३० वा.सादर होणार आहे.

अधिक माहितीसाठी दिपक कारकर-९९३०५८५१५३/९६५३३२३७३३ यांच्याशी संपर्क साधून,मनोरंजनाची परिपूर्ण हमी असणाऱ्या ह्या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद द्या असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments