रत्नागिरी : उद्यमनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. फैमिदा सुर्वे यांचे पती अली फारुक सुर्वे हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. याबाबत चार दिवसांपूर्वीच कुटुंबियांनी रत्नागिरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लावण्यात यश आलेले नाही.
कुटुंबीयांनी पोलिस तपासात अजिबात गती नसल्याची नाराजी व्यक्त केली असून, “लोकेशन मिळत नाही, तपास पुढे सरकत नाही” असेच चित्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढील चोवीस तासांत तपासात गती आली नाही तर संपूर्ण सुर्वे कुटुंब उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
खंडाळा परिसरातील दोन बेपत्ता प्रकरणांमध्ये तपासात ढिलाई झाल्याने त्यांचा खून झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अशा घटना रत्नागिरीत वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. “पोलिसांनी तातडीने अली फारुक सुर्वे यांचा शोध लावावा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल,” असा इशारा सुर्वे परिवाराने दिला आहे.